जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील मुलींना अश्लील चाळे करून दाखवणारा प्राध्यापक अतुल जोहरीला अटक करण्यात आली. त्यानंतर काही वेळातच या प्राध्यापकाला जामीनही मंजूर करण्यात आला. मागील दोन ते तीन दिवसांपासून जेएनयूचे विद्यार्थी या प्राध्यापकाच्या अटकेसाठी आंदोलन करत आहेत. सोमवारी तर दिल्लीतील वसंतकुंज पोलीस ठाण्याबाहेर मोठा राडाही झाला.

प्राध्यापक अतुल जोहरी हा वर्गातील मुलींना अश्लील इशारे करून दाखवतो. अश्लील टिपण्णी करतो अशी तक्रार या मुलांनी केली. एकूण ९ मुलींनी या प्राध्यापकाविरोधात तक्रार केली आहे. मात्र प्राध्यापकाने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. मंगळवारी जोहरीला अटक करण्यात आले त्यानंतर पतियाळा हाऊस कोर्टापुढे हजरही करण्यात आले. त्यानंतर प्राध्यापक अतुल जोहरीला जामीनही मंजूर करण्यात आला. मला तुरुंगात धाडले तर शिक्षक म्हणून माझे करीअर संपेल असे म्हणत अतुल जोहरीने जामीन मिळण्याची विनंती केली. ही विनंती कोर्टाने मान्य करत त्याला जामीन मंजूर केला.

अतुल जोहरीने लैंगिक शोषण केल्याचा आरोप ९ विद्यार्थिनींनी केला. त्यानंतर दोन ते तीन दिवस जेएनयूच्या विद्यार्थ्यांचे आंदोलनही सुरु होते. सोमवारी या आंदोलनाला काहीसे आक्रमक वळण लागले. मंगळवारी जोहरीला चौकशीसाठी बोलावण्यात आले आणि त्याचवेळी अटकही करण्यात आली अटक केल्यानंतर जोहरीला कोर्टापुढे हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला. जामीन मंजूर झाल्यानेही जेएनयूचे विद्यार्थी संतापले आहेत. या प्राध्यापकाचे निलंबन करावे अशीही मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.

माझ्या विरोधात कट रचला जात असल्याचा आरोप अतुल जोहरीने केला. तसेच या मुलांची वर्गातील हजेरी कमी असल्यामुळे माझ्याविरोधात खोटे आरोप केले जात असल्याचेही अतुल जोहरीने म्हटले आहे.