दिल्लीतील राजीव चौक मेट्रो स्थानकावरील सीआयएसएफच्या (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) जवानांनी मुस्लिम समजून आपल्याला मारहाण केल्याचा आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्याने केला. त्यांनी माझ्या दाढीकडे पाहिले आणि मी मुस्लिम समाजाचा असल्याचा त्यांचा समज झाला. त्यानंतर त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली, असा दावा विद्यार्थ्याने केला आहे. तुमच्यासारख्या मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवू असेही ते जवान म्हणाल्याचा आरोप त्याने केला. सीआयएसएफने मात्र त्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.

सीआयएसएफच्या जवानांनी मारहाण केल्याचा आरोप जेएनयूमध्ये शिक्षण घेणाऱ्या अमन सिन्हा या २२ वर्षीय विद्यार्थ्याने केला आहे. राजीव चौक मेट्रो स्थानकावर काल संध्याकाळी ही घटना घडली. मेट्रो स्थानकावरील तैनात सीआयएसएफच्या जवानाने मला इअरफोन काढायला सांगितले. पण मी त्याला नकार दिला. त्यावरून त्याला राग आला. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्याचवेळी तिथे सीआयएसएफचा दुसरा जवानही आला. तुम्ही राष्ट्राचे नाव खराब करत आहात, असे तो म्हणाला. तुम्हाला मुस्लिमांना पाकिस्तानला पाठवू, असेही तो जवान म्हणाल्याचा दावा अमनने केला आहे. या वादानंतर मला फरफटत कार्यालयात घेऊन गेले. तेथे सीसीटीव्ही कॅमेराही नव्हता आणि अन्य कुणी व्यक्तीही नव्हती. तेथे त्यांनी आपल्याला शिवीगाळ आणि मारहाणही केली, असा आरोप अमनने केला आहे. अमनने केलेले आरोप सीआयएसएफने फेटाळले आहेत. आपण विद्यार्थ्याला मारहाण केलीच नाही, असे सीआयएसएफने सांगितले.