जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका 6 सप्टेंबर रोजी पार पडणार आहेत. जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या निवडणूक समितीने शुक्रवारी निवडणुकीची रूपरेषा जाहीर केली. 27 ऑगस्ट रोजी नामनिर्देशनपत्र भरण्यात येणार आहेत. त्यानंतर 4 सप्टेंबर रोजी निवडणुकीसाठी प्रेसिडेंशिअल डिबेट घेतली जाणार आहे. तर 6 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 ते 1 आणि दुपारी 2.30 ते 5.30 दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकांपूर्वी ‘जेएनयूएसयू’च्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.

जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकांचे निकाल 8 सप्टेंबर रोजी लागणार असल्याची माहिती निवडणूक समितीचे अध्यक्ष शशांक पटेल यांन दिली. गेल्यावर्षी जेएनयूच्या निवडणुका 14 सप्टेंबर रोजी पार पडल्या होती. परंतु यावेळी 6 सप्टेंबर रोजी निवडणूक घेतली जाणार आहे. 25 ऑगस्ट रोजी मतदारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. तर 26 ऑगस्ट रोजी नामांकन अर्ज देण्यात येणार आहेत. तर 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 ते 5 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. 28 ऑगस्ट रोजी वैध उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. तर त्याच दिवशी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. तर लगेच तीन वाजता उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल.

3 सप्टेंबर रोजी विद्यापीठाची जनरल बॉडी मिटींग दुपारी 1 वाजता सुरू होईल. तर 4 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना आपले उमेदवार आणि त्यांचे निवडणुकीतील मुद्दे जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. रात्री 9 वाजता जेएनयूची प्रेसिडेंशिअल डिबेट सुरू होणार आहे. तर 5 सप्टेंबर रोजी कोणताही प्रचार करण्यात येणार नाही. 6 सप्टेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.