जवाहरलाल नेहरू विद्यापाठीतून गूढरित्या बेपत्ता झालेला विद्यार्थी नजीब अहमदला अलीगढमध्ये पाहिले आहे, असा दावा तेथील एका महिलेने पत्र लिहून केला आहे. या महिलेचे पत्र सुरुवातीला हॉस्टेलच्या संचालकांना मिळाला. ते त्यांनी नजीब अहमदची आई फातिमा नफीस यांच्याकडे सोपवले आहे. त्यांनी ते पत्र गुन्हे शाखेकडे दिले आहे.

नजीबला अलिगढच्या बाजारात पाहिले आहे, असा दावा या महिलेने पत्रात केला आहे. नजीब मदतीसाठी याचना करत होता. तसेच मला कुणीतरी येथे कैद करून ठेवले आहे, असे तो म्हणत होता. मी त्याची मदत करणार होते, पण त्यापूर्वीच तो तेथून कुठे गायब झाला, असा दावा तिने पत्रात केला आहे. या महिलेने पत्रात तिचा पत्ताही दिला आहे. माझ्याशी कुणीही संपर्क करू शकतो, असेही त्यात नमूद करण्यात आले होते.

पत्रात दिलेल्या पत्त्यावर गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी पोहोचले; मात्र तेथे कुणीही हाती लागले नाही. तसेच त्या पत्रात नजीबला कुठे कैद करून ठेवले आहे, त्या जागेचाही ठोस उल्लेख करण्यात आला नव्हता. दरम्यान, पत्र पोहोचवणाऱ्या कुरिअर एजन्सीकडेही विचारपूस केली जाणार आहे. ते पत्र कुठून आले आणि कुणी पाठवले, याबाबत विचारणा केली जाणार आहे. या पत्रावरील हस्ताक्षर ओळखण्यासाठी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येण्याची शक्यता आहे. याचदरम्यान नजीब जेएनयूमधून बेपत्ता झाल्यानंतर जामिया विद्यापीठात पोहोचला होता. त्या दिवसाचेही सीसीटीव्ही फुटेजही जामिया विद्यापाठाने पोलिसांकडे दिले आहेत.