जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थ्यांनी वसतिगृहासाठीच्या शुल्कवाढीविरोधात राष्ट्रपती भवनावर काढलेला मोर्चा दिल्ली पोलिसांनी भिकाजी कामा प्लेस मेट्रो स्टेशनजवळ अडवून त्यांच्यावर लाठीमार केला.

राष्ट्रपतींनी वसतिगृह शुल्कवाढ प्रकरणात लक्ष घालावे ही मागणी करत जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींना भेटण्यासाठी राष्ट्रपती भवनावर सोमवारी मोर्चा काढला होता. हा मोर्चा भिकाजी कामा प्लेस मेट्रो स्टेशन परिसरात पोहोचला असता विद्यार्थ्यांना अडविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्या वेळी काही विद्यार्थ्यांनी बॅरिकेट्स ओलांडण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ परिसरातही मोठय़ा प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी काही छायाचित्रे दाखवून पोलिसांनी विद्यापीठाची सर्व प्रवेशद्वारे बंद केली असल्याचा दावा केला आहे.

तर केवळ जेएनयूकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.  केंद्रीय सचिवालय, उद्योग भवनाच्या प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचा मार्ग, लोककल्याण मार्ग पोलिसांनी बंद केला आहे. या वेळी विद्यार्थ्यांनी ‘दिल्ली पोलीस परत जा’ आणि ‘शिक्षण सर्वासाठी मोफत हवे’ अशा घोषणा दिल्या.

वसतिगृहाचे शुल्क वाढवल्याच्या निषेधार्थ जेएनयूचे विद्यार्थी गेले महिनाभर वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहेत. तसे त्यांनी आगामी परीक्षेवरही बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.