दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या दंगलप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने काही दिवसांपूर्वी जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला अटक केली होती. बेकायदा कृत्यविरोधी कायद्यांतर्गत (UAPA) उमर खालिदला अटक करण्यात आली होती. दरम्यान, आज उमर खालिदला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमित रावत यांच्यासमोर हजर करण्यात आलं. यावेळी त्याला २२ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

पोलिसांनी दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवालात जातीय हिंसाचार हा कथितरित्या खालिद आणि इतर दोन जणांनी केलेला पूर्वनियोजित कट असल्याचा दावा करण्यात आला आहे. खालिदविरोधात देशद्रोह, खून, खुनाचा प्रयत्न, धर्माच्या आधारे समाजात द्वेष भडकावणारे आणि दंगल भडकवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खालिदनं दोन वेगवेगळ्या ठिकाणी भडकाऊ भाषणे केली आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान लोकांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचे आवाहन केलं. तसंच भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत आहेत हे आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवण्याचा यामागील उद्देश होता. हा कट रचण्यासाठी अनेक घरांमध्ये हत्यारं, पेट्रोल बॉम्ब, अ‍ॅसिड बाटल्या आणि दगड ठेवण्यात आले होते, असंही प्राथमिक माहिती अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

सह-आरोपी दानिश याला कथितरित्या दोन निरनिराळ्या ठिकाणांहून लोकांना जमा करणं आणि दंगल उसळवण्याची जबाबदारी देण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आसपास राहणाऱ्या लोकांमध्ये तणाव निर्माण व्हावा यासाठी २३ फेब्रुवारी रोजी महिला आणि लहान मुलांना जाफराबाद मेट्रो स्थानकाखालील रस्ता बंद करण्यास सांगितला होता. दिल्लीतील एका भागात २४ फेब्रुवारी रोजी नागरिकत्व कायद्याचे समर्थक आणि विरोधकांमध्ये हिंसाचार झाला होता. यामध्ये कमीतकमी ५३ जणांचा मृत्यू आणि २०० जण जखमी झाले असल्याचंही पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवालात म्हटलं आहे.

उमर खलिद आणि वाद?

जेएनयूत हिंदू देवी- देवतांचे आक्षेपार्ह चित्र लावून तेढ निर्माण केल्याचा आरोप खलिदवर झाला होता. तसेच अफझल गुरुला फाशी देण्यात आली त्या दिवशी जेएनयूत शोकसभा झाली होती. यातही खलिद सहभागी झाल्याचं सांगितले जातं.