नऊ गुन्हे नोंदवूनही प्रा. जोहरी कारवाईमुक्त का? : न्यायालयाचा सवाल

नवी दिल्ली : लैंगिक शेरेबाजीने छळवणूक झाल्याप्रकरणी नऊ विद्यार्थिनींनी पोलिसात तक्रार दाखल करूनही ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठा’ने (जेएनयू) प्रा. अतुल कुमार जोहरी यांच्यावर कोणतीही कारवाई का केली नाही, असा सवाल दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी केला. तसेच या विद्यार्थिनींचे पत्र हीच तक्रार मानून कारवाई सुरू करावी, असा आदेशही न्यायालयाने दिला.

विद्यार्थिनींना सुरक्षितपणे अध्ययन करता यावे यासाठी विद्यापीठाच्या आवारात प्रा. जोहरी यांना प्रवेश करू देऊ नये, या विद्यार्थिनींच्या मागणीबाबत विद्यापीठाला भूमिका मांडण्यासही न्यायाालयाने सांगितले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत तुम्ही विद्यापीठ आवारात येऊ नका, असे विद्यापीठ प्रशासन जोहरी यांना सांगू शकत नाही का, असा सवालही न्यायालयाने केला. संबंधित प्राध्यापकालाही बाजू मांडण्याची संधी द्या, पण काहीतरी ठोस करा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

विद्यापीठाच्या वकिलांनी सांगितले की, तक्रारदार विद्यार्थिनींनी त्यांची तक्रार विद्यापीठाकडे किंवा विद्यापीठाच्या तक्रारनिवारण समितीकडे मांडलेली नाही. त्यामुळे कोणतीही कारवाई आम्ही करू शकत नाही. तक्रार थेट पोलिसांकडे दाखल आहे. त्यामुळे कायद्यानुसार पोलिसांकडूनच काय ती कारवाई केली जाईल. त्यावर, या विद्यार्थिनींच्या वकील अ‍ॅड. वृंदा ग्रोव्हर यांनी सांगितले की, या विद्यार्थिनींनी विद्यापीठाकडे अनेकवार तक्रारी केल्या आणि त्यानंतरच पोलिसांत तब्बल आठ प्राथमिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे या विद्यार्थिनींना सुरक्षित वाटेल, असे वातावरण विद्यापीठाने निर्माण केले पाहिजे.  जोहरी आजही विद्यापीठातील त्यांच्या विभागाची सर्व प्रशासकीय कामे करीत आहेत आणि तक्रारदार विद्यार्थिनींना त्यांच्या हाताखाली संशोधनकार्य चालू ठेवावे लागत आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षित वाटत नाही.

तक्रारदार अभाविपचे, जोहरी भाजपचे?

आपल्याविरुद्धच्या तक्रारी हा राजकीय कट असल्याचा आरोप अतुल जोहरी  यांनी केला होता. तक्रारदार विद्यार्थिनी या डाव्या विचारांच्या असल्याचेही त्यांनी सूचित केले होते. २१ मार्चला यातील पाच तक्रारदार विद्यार्थिनींनी पत्रकार परिषद घेतली आणि आमच्यातील बहुसंख्यजणी या अभाविपच्या सदस्य आणि समर्थक आहेत, असे स्पष्ट केले. आठ तक्रारी असूनही काही मिनिटांत जोहरी यांना जामीन मिळाला, याचे कारण ते भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उघड समर्थक आहेत, असा आरोपही होत आहे.

कठोर पावलेच नडल्याचा दावा..

विद्यार्थ्यांच्या वर्गातील उपस्थितीबाबत मी कठोर पावले उचलल्यानेच हे आरोप झाले आहेत, असा दावा प्रा. जोहरी यांनी केला. मी ज्यांना ज्यांना कठोर कारवाईचे मेल पाठवले होते त्यात या विद्यार्थिनी होत्या. त्यामुळे त्यांनीच या खोटय़ा तक्रारी दाखल केल्या आहेत. ज्या कथित शेरेबाजीचे आरोप होत आहेत ती शेरेबाजी २०१३-१४मध्ये झाल्याचे तक्रारदारच म्हणतात. मग तक्रार दाखल करायला २०१८ का उजाडले, असाही प्रा. जोहरी यांचा सवाल आहे.