बॉलिवूड अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपने दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात झालेल्या हल्लावर ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्याने या ट्विटमधून भाजपाच्या आयटी सेलवर निशाणा साधला आहे. तसेच अनुरागने मोदी सरकारला दहशवादी संबोधले आहे.

काल ६ जानेवारी रोजी अनुरागने ट्विटच्या माध्यमातून जेएनयूच्या विद्यार्थांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील कार्टर रोड येथे आंदोलन केले. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पडले असून काही बॉलिवूड कलाकार यामध्ये सहभागी झाले होते. याच दरम्यान ट्विटरवर #अनुराग_कश्यप_आतंकी_हैं हा हॅशटॅग सोशल मीडियाव ट्रेंड झाला होता. काही भाजपा नेत्यांनी या हॅशटॅगद्वारे अनुरागवर निशाणा साधला होता. आता अनुरागने ट्विट करत चांगलेच सुनावले आहे.

‘मला माहिती नव्हते आयटी सेलला सत्याची इतकी भीती वाटते. जितकं ट्रेंड होणार तितकं सत्य समोर येणार. आणखी ट्रेंड करा. भाजपाचे सत्य सर्वांना सांगायचे आहे. दहशवादी सरकारचा भांडा फोड करायचा आहे’ असे ट्विट करत अनुरागने सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबईतील कार्टर रोड येथे झालेल्या आंदोलनात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. अनुराग व्यतिरिक्त विशाल भारद्वाज, अनुराग सिन्हा, जोया अख्तर, दिया मिर्झा, राहुल बोस, रिचा चड्ढा, स्वानंद किरकिरे, रीमा कागटी, हंसल मेहता, सयानी गुप्ता, गौहर खान, तापसी पन्नू आणि कुणाल कामरा हे कलाकार सहभागी झाले होते.