दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू)  झालेला हिंसाचार हे  गेली काही वर्षे इतर विद्यार्थ्यांचे अभ्यास व संशोधनाचे काम धोक्यात आणणाऱ्या काही मूठभर डाव्या दहशतवादी विद्यार्थ्यांचे कृत्य होते, असे मत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी व्यक्त केले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पाच जानेवारीला झालेला हिंसाचार हा डावे व त्यांच्या समर्थकांचे कटकारस्थान होते असा आरोपही त्यांनी केला.

ते म्हणाले की, गेली अनेक दशके जवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्यांच्या दहशतवादाने हजारो विद्यार्थ्यांचा छळ झाला आहे. आताचा हिंसाचार हा त्याचाच परिपाक असून अगदी मोजक्या डाव्या दहशतवादी विद्यार्थ्यांनी नेहमीच इतर हजारो विद्यार्थ्यांचा अभ्यास व संशोधन करण्याचा अधिकार हिरावून घेतला आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ५ जानेवारीला झालेल्या हिंसाचारात तोंडाला फडकी बांधलेल्या काही लोकांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना काठय़ा व गजांनी मारहाण केली होती. मालमत्तेचेही नुकसान केले होते. या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद  व डाव्या संघटनांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते.

जम्मू काश्मीरमधील परिस्थितीबाबत विचारले असता माधव यांनी सांगितले की, या केंद्रशासित प्रदेशात आता सुरळित स्थिती निर्माण झाली आहे. इंटरनेट सुरू करण्यात येत असून ते  बऱ्याच अंशी सुरूही करण्यात आले आहे. स्थानिक नेत्यांना स्थानबद्धतेतून सोडण्यात आले आहे. अजून २०-२५ नेत्यांची सुटका बाकी आहे.