News Flash

VIDEO: …म्हणून मी ‘FREE काश्मीर’ चं पोस्टर घेऊन उभी होते, तरुणीचं स्पष्टीकरण

दिल्लीमधील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराचा निषेध करताना मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावर स्वतंत्र काश्मीरचं पोस्टर झळकावण्यात आलं

दिल्लीमधील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराचा निषेध करताना मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावर स्वतंत्र काश्मीरचं पोस्टर झळकावण्यात आलं. एक तरुणी हे पोस्टर हातात घेऊन उभी असल्याचा फोटो समोर आल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. दरम्यान पोस्टर झळकावणाऱ्या तरुणीने आपल्या फेसबुक अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे. मेहक मिर्झा प्रभू असं नाव असणाऱ्या या तरुणीने आपण स्टोरीटेलर असल्याचं सांगितलं आहे.

मेहकने आपण जे पोस्टर घेऊन उभे होतो ते तिथेच पडलेलं होतं असा दावा व्हिडीओत केला आहे. व्हिडीओत मेहक सांगत आहे की, “मी मंगळवारी ६ जानेवारी रोजी लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाप्रमाणे गेटवे ऑफ इंडियावर निषेध आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेली होती. यावेळी मला तिथे एक खाली पडलेलं पोस्टर सापडलं, ज्यावर स्वतंत्र काश्मीर लिहिण्यात आलं होतं. काश्मीरमध्ये इंटरनेट, मोबाइल सेवा सुरळीत व्हावी या एकमेव इच्छेखातर मी ते पोस्टर हातात घेतलं. तेथील लोकांना मुलभूत अधिकारांपासून वंचित ठेवलं जात आहे”.

मी काश्मिरी नसून मुंबईची राहणारी आहे असं तरुणीने व्हिडीओत स्पष्ट केलं आहे. “इतर सामान्य नागरिकांप्रमाणे मीदेखील मुलभूत अधिकारांसाठी आवाज उठवते. माझा फक्त इतकाच उद्धेश होता. मी स्टोरीटेलर आहे, मी एक सामान्य नागरिक आहे. कोणत्याही गँगचा भाग नाही,” असं तरुणीने व्हिडीओत सांगितलं आहे.

मुंबई झोन-१ चे डीसीपी संग्राम सिंह यांनी या घटनेसंबंधी बोलताना या घटनेची गंभीर दखल घेतली असल्याची माहिती दिली होती. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार का? तसंच जी तरुणी पोस्टर घेऊन उभी होती तिची ओळख पटवली जाईल का? असं विचारलं असता त्यांनी नक्कीच केलं जाईल असं सांगितलं होतं.

दरम्यान पोलिसांनी सकाळी गेटवे ऑफ इंडियावर आंदोलन करणाऱ्या सर्व आंदोलकांना आझाद मैदानात शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी आंदोलकांना संवेदनशील असणाऱ्या या ठिकाणी आंदोलन न करता लवकरात लवकर जागा रिकामी करण्याची विनंती केली होती. पण आंदोलकांनी नकार देत पोलिसांविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी जबरदस्तीने आंदोलकांना आझाद मैदानात नेलं. आझाद मैदानात नेलं असता काही वेळातच आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2020 12:48 pm

Web Title: jnu violence free kashmir poster gateway of india poster girl facebook post sgy 87
टॅग : JNU Issue,JNU Row
Next Stories
1 नाना पाटेकर यांचा आंदोलक विद्यार्थ्यांना सल्ला, म्हणाले…
2 JNU Violence: सरकारचा भांडा फोड करायचा आहे, अनुरागचा मोदी सरकारवर निशाणा
3 पंतप्रधान मोदी एकतर दंगलखोरांसोबत आहेत किंवा अकार्यक्षम : सीताराम येचुरी
Just Now!
X