जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर रविवारी झालेल्या जीवघेण्याच्या हल्ल्याची जबाबदारी ‘हिंदू रक्षा दल’ या संघटनेने स्वीकारली आहे. या संघटनेचा नेता भुपेंद्रकुमार तोमर ऊर्फ पिंकी चौधरी याने याची माहिती दिली. आपण हिंदू रक्षा दलाचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे त्याने म्हटले आहे. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याद्वारे त्याने ही जबाबदारी स्वीकारली आहे.

व्हायरल व्हिडिओत चौधरी म्हणतो, “जे कोणी लोक देशविरोधी कृत्ये करतील त्याचा परिणाम जेएनयूतील विद्यार्थ्य्यांप्रमाणे असेल. जेएनयूत रविवारी रात्री झालेल्या हल्ल्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत. आमच्या धर्माविरोधात इतकं चुकीचं बोलणं योग्य नाही. अनेक वर्षांपासून जेएनयू कम्युनिस्टांचा अड्डा बनला आहे.”

चौधरीने यात दावा केला आहे की, जेएनयूमध्ये रविवारी जी कारवाई करण्यात आली त्यामध्ये सर्वजण ‘हिंदू रक्षा दला’चे कार्यकर्ते होते. पिंकी चौधरी याच्याविरोधात यापूर्वी देखील हिंसाचाराप्रकरणी अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. आम आदमी पार्टीच्या कार्यालयावर हल्ल्यासह इतर अनेक प्रकरणात चौधरीने तुरुंगवास भोगला आहे. दरम्यान, चौधरीच्या या दाव्याची दखल दिल्ली पोलिसांनी घेतली असून चौकशी सुरु करण्यात आली आहे.

रविवारी रात्री उशीरा काही अज्ञात बुरखाधारी लोकांनी जेएनयूच्या आवारात घुसून साबरमती होस्टेलची तोडफोड केली होती. तसेच अनेक विद्यार्थ्यांवर लाठ्या-काठ्यांनी आणि बॅटने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यामध्ये काही प्राध्यापकांनाही मारहाण झाली होती. जेएनयूतील विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयेषी घोष हिला टार्गेट करण्यात आले होते. तिच्या डोक्यात प्रहार करण्यात आल्याने ती गंभीर जखमी झाली होती. दरम्यान, जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी आरोप केला होता की, हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी घडवून आणला आहे. तर अभाविपच्या विद्यार्थ्यांनी याचा इन्कार केला होता, उलट यामध्ये डाव्या पक्षाच्या विद्यार्थी संघटनांचाच हात असल्याचा आरोप अभाविपने केला होता.