दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हाणामारीच्या घटनचा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. या घटनेतील हल्लेखोरांना स्थानिक सत्ताधारी पक्षाचे पाठिंबा असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

मी या हिंसाचाराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. ज्यांनी हा हल्ला केला त्यांना तेथील सत्ताधारी पक्षाचा पाठिंबा आहे व त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानेच या हल्लेखोरांनी जेएनयूच्या आवारात प्रवेश केला, यात काहीच शंका नाही. चेहरा झाकून आलेल्या हल्लेखोरांनी भ्याडपणे विद्यार्थ्यांवर हल्ला केला. या हल्लेखोरांना लोखंडी सळ्या, काठ्यांसह जेएनयूमध्ये घुसण्याची परवानगी दिल्या गेली. त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षावर देखील हल्ला केला व सगळीकडे दहशतीचे वातावरण निर्माण केले. या हल्ल्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. सर्वात वाईट गोष्ट ही की पोलिसांनी त्यांना सुरक्षित मार्गाने जाऊ दिले.

हे एक केंद्रीय विद्यापीठ आहे. हे ठरवणे सरकारची जबाबादारी आहे की, ते कशाप्रकरचा संदेश जगभरात पाठवू इच्छित आहेत. हे चालणार नाही, याची निषेध केला गेला पाहिजे. येथील विद्यार्थी उद्या देशाचे नेतृत्व करणार आहे व तुम्ही त्यांना मारत आहात, असे देखील ओवैसी म्हणाले.

जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा देशभरातून निषेध करण्यात आला आहे. जेएनयूमधील हल्ल्याचे वृत्त समजताच मोठ्या संख्येने विद्यार्थी गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात जमले आणि रात्रभर या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं होतं. ‘ऑक्युपाय गेटवे’ या मोहिमेतून विद्यार्थ्यांचे लोंढे ‘गेटवे’कडे वळू लागले होते. मंगळवारी पोलिसांनी आंदोलकांना गेट वे ऑफ इंडियच्या परिसरातून हटवलं. तसंच त्यांची रवानगी आझाद मैदानात करण्यात आली. परंतु काही वेळानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.