जवाहरलाल नेहरू विद्यापीठात करण्यात आलेल्या हल्ल्याचा तपास सध्या दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेत आणखी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी ओळख पटवलेली तरुणी अभाविपची (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) सदस्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. अभाविपच्या सचिवानेच याला दुजोरा दिला आहे.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) ५ जानेवारी रोजी तोंड बांधून आलेल्या तरुणांच्या टोळक्यानं हल्ला केला होता. या हल्ल्याचे देशभरात पडसाद उमटल्यानंतर केंद्र सरकारने चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, दिल्ली पोलिसांना हल्लेखोरांपैकी एका तरुणीची ओळख पटवण्यात यश मिळवले. ही तरुणी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी असून, पोलिसांनी तिला चौकशी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे.

शर्मा आमच्या संघटनेची सदस्य

कोमल शर्मा असं या तरुणीचं नावं आहे. जेएनयूमधील साबरमती वसतिगृहात काही तरुणांबरोबर असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. दिल्ली पोलिसांनी व्हिडीओच्या आधारे तपास करुन तिला नोटीस पाठवली आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी याची माहिती दिल्यानंतर अभाविपनं शर्मा संघटनेची सदस्य असल्याची मान्य केलं आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’नं याविषयी वृत्त दिलं आहे. अभाविपचे दिल्ली सचिव सिद्धार्थ यादव यांनी शर्मा संघटनेची सदस्य असल्याचं म्हटलं आहे. “सोशल मीडियात तिला ट्रोल केल जाऊ लागल्यानंतर आम्ही तिच्यापर्यंत पोहचू शकलो नाही. तिला पोलिसांनी समन्स बजावले आहे की नाही, याविषयी आम्ही तिला विचारलेलं नाही,” असं यादव यांनी सांगितलं.

नावाची बदनामी; शर्माची महिला आयोगाकडे धाव –

जेएनयू हल्लाप्रकरणी नोटीस बजावलेल्या कोमल शर्मा या तरुणीनं राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. आपल्या नावाची बदनामी करण्यात आल्याची तक्रार तिने आयोगाकडे केली आहे. या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगानं दिल्ली पोलिसांसह माध्यमांना यात लक्ष देण्यासाठी पत्र पाठवले आहे.