आंदोलने आणि वादांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाला (जेएनयू) सर्वाधिक उत्तम विद्यापीठांच्या विभागात यंदाचा ‘व्हिजिटर्स अवॉर्ड’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार ६ मार्चला राष्ट्रपती भवनात प्रदान करण्यात येईल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी याबद्दलची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी देशभरात ओळखले जाते. याबद्दल जेएनयूचा समावेश देशातील पहिल्या १० विद्यापीठांमध्ये होतो. गेल्या काही दिवसांपासून जेएनयू देशविरोधी घोषणाबाजी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत होते. मागील वर्षीदेखील देशविरोधी घोषणाबाजी आणि त्यानंतर विद्यार्थी संघटनांमधील वाद यामुळे जेएनयू वादग्रस्त ठरले होते. या विद्यापीठाच्या कन्हैया कुमार आणि उमर खालिद यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटलादेखील सुरू आहे. सध्या हे दोघेही जामिनावर सुटले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट विचारधारेचा प्रभाव असल्याचा आरोप जेएनयूवर कायम केला जातो.

जवाहरलाल नेहरु विद्यापीठाला व्हिजिटर्स श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे. तर संधोधन क्षेत्रात बनारस हिंदू विद्यापीठाच्या डॉ. श्याम सुंदर आणि तेझपूर विद्यापीठाच्या प्राध्यापक निरंजन करक यांना संधोधनासाठीचा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. तर सेंट्रल विद्यापीठाच्या डॉ. दीपक पंत यांना नवीन उपक्रमांसाठी व्हिजिटर्स अवॉर्ड जाहीर झाला आहे.

मागील वर्षीदेखील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाला तीनपैकी दोन व्हिजिटर्स अवॉर्ड्सने गौरवण्यात आले होते. देशभरातील विद्यापीठांमध्ये स्पर्धा व्हावी आणि त्यांचा दर्जा वाढावा, या हेतूने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २०१४ मध्ये विद्यापीठांना त्यांच्या विविध क्षेत्रांमधील कामगिरीचा गौरव करण्यास सुरुवात केली.