काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जमावाकडून होणाऱ्या मारहाणीच्या घटनांसाठी नोटाबंदी, बेरोजगारी आणि जीएसटी जबाबदार असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. बेरोजगारीमुळे लोकांमध्ये प्रचंड संताप असून, नोटाबंदीमुळे छोटे उद्योग भरकटले आहेत आणि जीएसटीची भाजपाकडून अत्यंत चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी करण्यात आल्याचं राहुल गांधी बोलले आहेत. जर्मनीमधील हॅमबर्ग येथे बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट करत छोट्या आणि मध्यम उद्योगांना उद्ध्वस्त केल्याने अनेकजण बेरोजगार झाल्याचं म्हटलं. त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने जीएसटीची अंमलबजावणी केली, ज्यामुळे गुंतागुंत झालं असल्याचंही ते बोलले आहेत.

‘छोट्या उद्योगांवर अवलंबून असणाऱ्या अनेकांना पुन्हा आपल्या गावी जावं लागलं. सरकारने केलेल्या या तीन गोष्टींमुळे देश संतापला आहे. आणि याच गोष्टी वृत्तपत्रात वाचायला मिळतात. जेव्हा तुम्ही जमावाकडून मारहाण झाल्याचं ऐकता, भारतात दलितांवर हल्ला झाल्याचं ऐकता, अल्पसंख्यांकावर हल्ला झाल्याचं ऐकता तेव्हा यामागे हेच कारण असतं’, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

यावेळी राहुल गांधींनी भाजपा सरकारवर दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकांना विकासाच्या प्रक्रियेपासून दूर ठेवल्याचा आरोप केला. ’21 व्या शतकात लोकांना सहभागी न करुन घेणं धोक्याचं आहे. जर तुम्ही लोकांना योग्य दृष्टीकोन दिला नाही तर इतर कोणीतरी देईल. त्यामुळे इतक्या मोठ्या वर्गाला विकासाच्या प्रक्रियेपासून दूर ठेवणं जोखमीचं आहे’, असं राहुल गांधी बोलले आहेत.

‘भाजपा सरकारला आदिवासी, गरीब शेतकरी, कनिष्ठ जातीतील लोकांना आणि अल्पसंख्याकांना श्रीमंताना मिळणारे फायदे मिळू द्यायचे नाहीत’, असा आरोप त्यांनी यावेळी केला. विशेष म्हणजे राहुल गांधींनी लोकसभेत घेतलेल्या नरेंद्र मोदींच्या गळाभेटीचा उल्लेख करत पक्षातील अनेक नेत्यांना ते आवडलं नव्हतं असं सांगितलं.

राहुल गांधींनी यावेळी राजीव गांधींच्या मारेकऱ्यांवरही भाष्य केलं. ‘जेव्हा मी माझ्या वडिलांच्या मारेकऱ्याचा मृतदेह पाहिला तेव्हा मला ते आवडलं नाही. मला त्याच्यात त्याची रडणारी मुलं दिसत होती’, असं ते म्हणाले. राजीव गांधींच्या हत्येमागे एलटीटीईच्या प्रभारकरनचा हात होता. श्रीलंकेत २००९ साली त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आलं.