स्वयंघोषित संत आसाराम बापू यांना गुजरात पोलीसांच्या ताब्यात देण्यास जोधपूरमधील न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. आसाराम बापूंविरोधात गुजरातमधील दोन बहिणींपैकी मोठ्या बहिणीने लैंगिक शोषण केल्याचा आरोप सुरत पोलीसांकडे केला होता. हा गुन्हा नंतर अहमदाबादमधील चांदखेडा पोलीसांकडे वर्ग करण्यात आला होता. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी आसाराम बापूंना गुजरात पोलीसांच्या ताब्यात देण्यास न्यायालयाने परवानगी दिली.
आसाराम बापू आणि या खटल्यातील अन्य चार आरोपींच्या न्यायालयीन कोठडीतही जोधपूर न्यायालयाने आणखी १४ दिवसांची वाढ केली. गेल्या महिन्यापेक्षा जास्त काळ आसाराम बापू जोधपूरमधील तुरुंगात आहेत. आसाराम बापू आणि इतर आरोपींना २५ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर करावे, असा आदेश न्यायालयाने पोलीसांना दिला आहे.
गांधीनगरमधील न्यायालयाने आसाराम बापूंविरोधात वॉरंट जारी केले होते. ते गुजरात पोलीसांनी शुक्रवारी जोधपूर न्यायालयात दाखविल्यावर आसाराम बापूंचा ताबा गुजरात पोलीसांना देण्याची सूचना न्यायालयाने केली.