अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपप्रकरणी ७२ वर्षीय वादग्रस्त ‘आध्यात्मिक गुरू’ आसारामबापू यांनी चार दिवसांत जबानीसाठी जोधपूरच्या पोलीस ठाण्यात हजर राहावे, असे फर्मान पोलिसांनी जारी केले आहे. आसारामबापू यांच्या अहमदाबाद येथील आश्रमातील प्रतिनिधीस संबंधित समन्स देण्यात आले. जोधपूरचे (पश्चिम विभाग) उपायुक्त अजयपाल लांबा यांनी ही माहिती दिली. आसारामबापू यांनी आपल्याला आवश्यक ते सहकार्य न केल्यास, आमचे समन्स न स्वीकारल्यास आम्ही त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई सुरू करू, असा इशारा लांबा यांनी दिला. दरम्यान, आसारामबापू यांच्यावर कडक कारवाई करण्याची एकमुखी मागणी लोकसभेतील अनेक सदस्यांनी केली.
या प्रकरणी चौकशी केल्यानंतर आसारामबापूंविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीत सकृद्दर्शनी तथ्य असल्याचे आढळल्यामुळे त्यांना चौकशीसाठी पाचारण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे लांबा यांनी स्पष्ट केले. आसारामबापू यांनी ३० ऑगस्ट किंवा त्यापूर्वी आमच्यापुढे हजर राहावे, असे त्यांना सांगण्यात आल्याचे लांबा म्हणाले. सदर मुलीने केलेल्या आरोपप्रकरणी आसारामबापू यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, ही मुलगी आपल्याला मुलीसारखी, नातीसारखी असून आपण निर्दोष आहोत अशी रंगसफेदी करून आसारामबापू यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.लोकसभेतही तीव्र पडसाद
आसारामबापूंच्या या लीलांचे संसदेतही सोमवारी तीव्र पडसाद उमटून त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लोकसभेतील अनेक संतप्त सदस्यांनी केली. या प्रकरणी तपासकाम सुरू असल्याचे सांगून सदस्यांच्या मागणीस सरकारला तत्पर प्रतिसाद द्यावा लागला.मुंबईतील महिला छायाचित्रकारावर झालेल्या बलात्काराचा मुद्दा लोकसभेत शून्य प्रहरात उपस्थित करण्यात आला. त्याच वेळी आसारामबापूंच्या या कृत्याचेही सदनात पडसाद उमटले. एक तथाकथित साधू देशाला वेठीस धरत आहे. अशा वेळी सरकार काय करीत आहे, एका मुलीने त्याच्याविरोधात बलाताकाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे सरकारने कारवाई केलीच पाहिजे, अशी मागणी जनता दलाचे (युनायटेड) शरद यादव यांनी केली. या साधूला शिक्षा झाली तर देशभरात एक प्रबळ संदेश जाईल, असेही ते म्हणाले. कम्युनिस्ट पक्षाचे गुरुदास दासगुप्ता आणि अनेक सदस्यांनीही आसारामबापूंविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली. आसारामबापूंवर बंदीच घाला, असे दासगुप्ता यांनी संतप्तपणे सांगितले तर अशा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी शिरोमणी अकाली दलाच्या सदस्या हरसिम्रत कौर यांनी केली.