अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष बायडेन यांचे आवाहन

वॉशिंग्टन : नागरिकांच्या एकजुटीचे वचन देत अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी, आपण सर्व अमेरिकी नागरिकांचा अध्यक्ष असल्याची ग्वाही पहिल्याच भाषणात दिली. अमेरिकी नागरिकांचे ध्रुवीकरण करणारे ‘भीषण भयपर्व’ संपवूया, असे आवाहनही त्यांनी केले.

अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत मिळवलेला ऐतिहासिक विजय साजरा करताना नियोजित अध्यक्ष बायडेन यांनी डेलावेअर येथील विलमिंग्टन या आपल्या मूळ शहरात केलेल्या भाषणात, आपण सर्व अमेरिकी नागरिकांचा अध्यक्ष असून दुही माजवण्यासाठी नव्हे, तर नागरिकांची एकजूट साधण्यासाठी वचनबद्ध असल्याचे स्पष्ट केले. मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीत वांशिक दंगलींनी पोळलेल्या अमेरिकी नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न बायडेन यांनी केला. आपल्याला लाल राज्ये आणि निळी राज्ये (रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक) हा फरक दिसत नाही, तर सर्व राज्ये एकसारखीच दिसतात. कुठलाही भेदभाव न करता आपण काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अमेरिकेच्या गेल्या १२० वर्षांच्या इतिहासात प्रथमच सात कोटी चार लाखांहून अधिक मते मिळाल्याचा संदर्भ देऊन बायडेन म्हणाले, ‘‘अमेरिकी नागरिक व्यक्त झाले आहेत. त्यांनी आम्हाला स्पष्ट, निर्विवाद विजय मिळवून दिला आहे. हा त्यांचा विजय आहे.’’ डेमोक्रॅट म्हणून निवडणूक लढवली असली तरी मी आता अमेरिकेचा अध्यक्ष असेन. निवडणुकीत ज्यांनी मला मते दिली नाहीत त्यांच्यासाठी आणि ज्यांनी मते दिली त्यांच्यासाठीही मेहनत करीन, अशी ग्वाही बायडेन यांनी दिली.

आपल्या समर्थकांना धन्यवाद देताना ते म्हणाले, ‘‘तुम्ही दाखवलेल्या विश्वासामुळे मी सद्गतीत झालो आहे. मी २० जानेवारी २०२१ रोजी अध्यक्षपदाची शपथ ग्रहण करणारा सर्वात ज्येष्ठ अध्यक्ष असेन.’’ त्यांच्या या वक्तव्याला नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडात दाद दिली आणि त्यांचा जयजयकार केला. आपल्या १५ मिनिटांच्या भाषणात बायडेन यांनी मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्या फुटीच्या राजकारणावर टीका केली आणि ऐक्याचे आवाहन केले. चला, अमेरिकेतील एका दुर्जन युगाच्या समाप्तीला आतापासून प्रारंभ करूया, असे आवाहन त्यांनी केले. डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन यांनी एकमेकांना सहकार्यास नकार देण्यामागे आमच्या नियंत्रणापलीकडील कोणतीही रहस्यमय शक्ती नव्हती, असे अर्थगर्भित आणि सूचक विधान बायडेन यांनी केले.

ट्रम्प यांच्या समर्थकांना उद्देशून बायडेन यांनी आश्वासक वक्तव्ये केली. ते म्हणाले, ‘‘तुमचा हिरमोड झाला, हे मी समजू शकतो, पण मी दोनदा पराभूत झालो आहे. आता एकमेकांना एक संधी देऊया. आता अमेरिकेची संकटातून मुक्तता करण्याची ही वेळ आहे.’’ मला ज्यांनी मतदान केले त्यांच्यासाठी मी जेवढे काम करेन तेवढेच तुमच्यासाठीही करेन, असा विश्वास बायडेन यांनी दिला.

हा लढा आहे..

सध्याच्या संकटाच्या काळाशी लढण्यासाठी विज्ञान आणि आशा या दोन सैन्यदलांच्या तैनातीची आवश्यकता आहे. हा लढा विषाणूला नियंत्रित करण्याचा, समृद्धीचा आणि आपल्या सर्वाच्या कुटुंबाच्या आरोग्य सुरक्षित करण्याचा आहे. त्याचबरोबर वांशिक न्यायासाठीचा, वंशवादाची पाळेमुळे देशातून खणून काढण्याचा, वातावरण संरक्षणाचा, सभ्यतेच्या पुनर्रस्थापनेचा आणि लोकशाही संरक्षणाचाही हा लढा आहे, असे बायडेन म्हणाले.

अमेरिकेच्या आत्म्याची पुनस्र्थापना

अमेरिकेचा आत्मा पुनस्र्थापित करण्यासाठी, देशाचा मुख्य आधार असलेल्या मध्यमवर्गाच्या पुनर्बाधणीसाठी आणि संपूर्ण जगात अमेरिकेचा पुन्हा सन्मानाने उल्लेख व्हावा आणि सर्व अमेरिकी नागरिकांमध्ये एकी निर्माण  करण्यासाठी अध्यक्षपदाचा उपयोग करीन, असा विश्वासही बायडेन यांनी व्यक्त केला.

पहिले काम करोना नियंत्रण

करोना विषाणू साथ आटोक्यात आणणे हे आपले पहिले काम असेल. त्यासाठी शास्त्रीय पायावर आधारित आराखडा तयार करण्यात येईल, असे बायडेन यांनी सांगितले. ‘सोमवारीच ‘बायडेन-हॅरिस करोना प्रतिबंध योजना’ तयार करण्यासाठी तज्ज्ञ आणि वैज्ञानिकांच्या गटाची नियुक्ती करणार आहे. करोना नियंत्रणासाठी आपण  सर्व प्रकारचे प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

तिसऱ्या प्रयत्नांत विजयाला गवसणी

जो बायडेन २० जानेवारी २०२१ रोजी अध्यक्षपदाची शपथ घेतील. अध्यक्षपदाची शपथ घेणारे ते आतापर्यंतच्या सर्व अध्यक्षांमध्ये सर्वात वयोवृद्ध आहेत. ७ कोटी चार लाखांहून अधिक मतदारांनी बायडेन यांना कौल दिला. १९८८, २००८मध्ये अपयशी ठरल्यानंतर आता २०२० मध्ये ते तिसऱ्या प्रयत्नात अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.

भाषणसार

– देशात दुही माजवण्यासाठी नाही, तर नागरिकांत एकजूट साधण्यासाठी वचनबद्ध.

– अमेरिकेच्या जखमांवर फुंकर घालण्याचा हा क्षण आहे.

– जगात अमेरिकेचा पुन्हा सन्मानाने उल्लेख व्हावा, यासाठी कटिबद्ध.

– आपण एकमेकांचे शत्रू नाहीत, अमेरिकी नागरिक आहोत.

– माझ्यासाठी सर्व नागरिक समान आहे, मी कुठलाही भेदभाव बाळगणार नाही.

– मी दोनदा पराभूत झाल्याने पराभवाचा अनुभव मी घेतला आहे, पण आता एकमेकांना संधी देऊ.

ट्रम्प यांचा रडीचा डाव सुरूच

मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव मान्य करण्यास नकार दिला आहे. त्यांचे जावई जॅरेड कुश्नर यांनीही त्यांची भेट घेऊन त्यांना पराभव मान्य करण्याची विनंती केली. ट्रम्प यांनी पेनसिल्वेनियासह अनेक महत्त्वाच्या राज्यांतील निकालांबाबत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. निरीक्षकांना मतमोजणी केंद्रात जाण्यास मनाई करण्यात आली. असे कधीही घडलेले नाही. मी निवडणूक जिंकलो आहे, असे ट्विट ट्रम्प यांनी केले आहे.

जगातील सर्वात जुन्या लोकशाही देशाची पहिली महिला उपाध्यक्ष, पहिली कृष्णवर्णीय आणि भारतीय वंशाची उपाध्यक्ष म्हणून मी महिलांसाठी असलेली अनेक बंधने तोडली आहेत. तुम्ही या निवडीतून आशा, एकता, सभ्यता, विज्ञान, सत्य यांची निवड केली आहे. कमला हॅरिस, नियोजित उपाध्यक्ष