डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार म्हणून जो बायडेन यांच्या नावाला अधिकृत मान्यता देण्यात आली. डेमोक्रॅटिक पक्षाचे अधिवेशन आभासी पद्धतीने झाले त्यात हे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. आता ३ नोव्हेंबर रोजी अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन नेते व विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तसेच डेमोक्रॅटिकपक्षाचे उमेदवार बायडेन यांच्यात कडवी झुंज होणार आहे.

बायडेन (वय ७७) यांनी जानेवारी २००९ ते जानेवारी २०१७ अशी आठ वर्षे अमेरिकेचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. गुरुवारी ते उमेदवारी स्वीकारल्याबाबत भाषण करणार आहेत. डेलावरचे सिनेटर असलेल्या बायडेन यांनी सांगितले की, अमेरिकी अध्यक्षपदाची उमेदवारी स्वीकारताना आपल्याला आनंद होत आहे. त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांनी सांगितले की, देशातील लोकांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नेतृत्व  हवे आहे.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिनिधींनी आभासी अधिवेशनात जो बायडेन यांच्या उमेदवारीवर अखेरचे शिक्कामोर्तब केले. बायडेन यांनी पन्नास राज्यातून आलेल्या प्रतिनिधींच्या आभासी हजेरीनंतर उमेदवारी स्वीकारली. बायडेन यांनी भारत व अमेरिका यांच्यात अणुकरार घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. बायडेन यांचे त्यांच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरीस यांनी अभिनंदन केले आहे. सध्याच्या परिस्थितीत बायडेन हे ट्रम्प यांच्यापेक्षा ७.७ गुणांनी आघाडीवर आहेत. जूनमध्ये ही आघाडी १०.२ गुणांची होती. दरम्यान ट्रम्प यांच्या अध्यक्षीय उमेदवारीवर पुढील आठवडय़ात रिपब्लिकन पक्षाच्या  आभासी अधिवेशनात शिक्कामोर्तब होणार आहे.

दरम्यान डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिवेशनात माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, जिमी कार्टर, माजी परराष्ट्र मंत्री कॉलिन पॉवेल यांनी हजेरी लावून बायडेन यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. बायडेन यांनी अमेरिकेला यापूर्वी मंदीतून बाहेर काढले आता ते पुन्हा ही करामत करून दाखवतील असे क्लिंटन यांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका जगात आघाडीवर असल्याचा दावा केला असला तरी आपल्या देशात बेरोजगारी तीन पट वाढली आहे, एकेकाळी देशाचे नियंत्रण करणाऱ्या ओव्हल कार्यालयात सध्या गोंधळ आहे. अमेरिकी इतिहासात आताच्या क्षणी बायडेन हेच नेतृत्व करण्यास योग्य आहेत असे क्लिंटन यांनी स्पष्ट केले.