News Flash

लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवल्याने कोणताही नकारात्मक परिणाम नाही – डॉ. फौची

"भारत सरकार लष्कराची मदत घेऊ शकते", असा सल्ला डॉ. फौची यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

सिरम इन्स्टिट्युटने उत्पादित केलेल्या कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवण्याचा निर्णय नुकताच केंद्र सरकारने घेतला. या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत असतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौची यांनी त्यावर आपली भूमिका मांडली आहे. “भारतानं कोविशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधलं अंतर वाढवण्याचा घेतलेला निर्णय वाजवी आहे”, असं डॉ. फौची म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतातील करोना परिस्थितीच्या हाताळणीवर फौची यांनी परखडपणे भूमिका मांडली होती. मात्र, आता फौची यांनी भारत सरकारच्या या निर्णयाचं समर्थन केलं आहे. त्यासाठी कारणं देखील दिली आहेत. तसेच, येत्या काळात भारतानं कोणत्या प्रकारे पावलं उचलायला हवीत, यावर देखील डॉ. फौची यांनी सल्ला दिला आहे.

“जेव्हा तुम्ही भारतासारख्या कठीण परिस्थितीत असता…!”

कोविशिल्ड लसीच्या डोसमधलं अंतर वाढवण्याच्या निर्णयाचा फौची यांनी लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला आहे. “जेव्हा तुम्ही भारतासारख्या कठीण परिस्थितीत असता, तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे मार्ग शोधावे लागतात. त्यामुळे मला वाटतं की दोन डोसमधलं अंतर वाढवण्याचा भारत सरकारचा निर्णय वाजवी आहे”, असं ते म्हणाले आहेत. तसेच, “डोसमधलं अंतर वाढवल्यामुळे लसीच्या परिणामकारकतेवर कोणताही परिणाम होत नाही”, असं देखील डॉ. फौची म्हणाले आहेत.

 

फक्त २ टक्के भारतीयांना दोन्ही डोस!

एएनआयशी बोलताना डॉ. अँथनी फौची यांनी भारतातील लसीकरण मोहिमेविषयी देखील केंद्र सरकारला सल्ला दिला आहे. “भारतानं आपल्या लसीकरणाची क्षमता वाढवण्यासाठी इतर देशांसोबत प्रयत्न करायला हवेत. भारत हा एक उत्तम लस उत्पादक देश आहे. भारतानं भारतीयांसाठी काही गोष्टी वापरायला हव्या होत्या”, असं फौची यांनी नमूद केलं आहे. “भारत हा जवळपास १४० कोटी लोकांचा खूप मोठा देश आहे. त्यात तुमच्या लोकसंख्येच्या फक्त २ टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस दिले गेले आहेत. सुमारे १० टक्के लोकांना लसीचा एकच डोस दिला गेला आहे. त्यामुळे भारतानं आपली स्वत:ची लस उत्पादन क्षमता वाढवण्याबरोबरच इतर देश आणि कंपन्यांसोबत यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे”, असं देखील फौची यांनी नमूद केलं आहे.

“…म्हणून भारतात करोनाची इतकी वाईट परिस्थिती!” डॉ. फौचींनी सांगितलं कारण!

भारत लष्कराची मदत घेऊ शकतो!

दरम्यान, भारतातील रुग्णांसाठी बेडचा तुटवडा निर्माण झाल्याच्या बाबीवर देखील फौची यांनी सल्ला दिला आहे. “काही गोष्टी वेगाने करण्यासाठी भारत लष्कराची मदत घेऊ शकतो. उदाहरणार्थ भारतात सध्या बेडचा तुटवडा निर्माण झाला आहे. फील्ड हॉस्पिटल उभारण्याच्या कामी लष्कराची मदत घेता येईल. लष्कराकडून असे हॉस्पिटल युद्धाच्या प्रसंगी उभारले जातात. नियमित रुग्णालयांना हे हॉस्पिटल्स पर्याय ठरू शकतील”, असं फौची यांनी सांगितलं आहे.

भारताने आधीच निर्बंध शिथिल केल्यामुळे दुसरी लाट – फौची

स्पुटनिक लस परिणामकारक!

भारतामध्ये पुढील आठवड्यापासून रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे डोस दिले जाणार आहेत. त्यासंदर्भात फौची यांनी या लसीवर विश्वास दाखवला आहे. “ही लस करोनाविरोधात परिणामकारक वाटतेय. तिची परिणामकारकता ९० टक्क्यांपर्यंत नमूद करण्यात आली आहे”, असं ते म्हणाले. तसेच, “श्रीमंत आणि लस उत्पादन व वितरण करण्याची क्षमता असणाऱ्या देशांनी नैतिक जबाबदारी पार पाडत गरीब देशांना लसीकरण करण्यात मदत करायला हवी”, असं आवाहन फौची यांनी यावेळी केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2021 7:52 pm

Web Title: joe biden medical adviser dr anthony fauci on covishield vaccination in india pmw 88
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 Corona: केरळमध्ये लॉकडाउन पुन्हा वाढवला; आता राज्यात २३ मे पर्यंत निर्बंध
2 लपवाछपवी! गुजरातमध्ये दिवसाला १,७४४, तर ७१ दिवसात सव्वालाख लोकांचा मृत्यू
3 बारावीच्या परीक्षांबाबत CBSE चा अद्याप निर्णय नाही, विद्यार्थी-पालक संभ्रमात!
Just Now!
X