डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवार जो बायडेन यांनी आपण निवडून आलो तर मोफत करोनाची लस देण्यात येईल असं सांगितले आहे. करोना व्हायरससोबत लढण्यासाठी हे एक राष्ट्रीय योजना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जेंव्हा करोना व्हायरसवरील सुरक्षित आणि उपयोगी अशी लस येईल तेव्हा अमेरिकेतल्या प्रत्येक नागरिकाला ही लस मोफत देण्यात येईल. जर एखाद्या व्यक्तीचा विमा नसेल त्याला ही लस मोफत देण्यात येणार असल्याचे बिडेन यांनी सांगितले. जर मी निवडणूक जिंकलो तर करोनासोबत लढण्यावर सगळे लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बायडेन यांनी एका प्रचार सभेत जनतेसोबत संवाद साधताना हे आश्वासन दिले आहे.

आणखी वाचा- US Presidential Election 2020: बॅलेटवर गुजराती, हिंदीसहीत सहा भारतीय भाषा

शुक्रवारी अध्यक्षीय पदासाठीच्या अंतिम चर्चेदरम्यान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी येत्या काही आठवड्यांत करोनावरील लस जाहीर केली जाईल असा दावा केला होता. करोनाचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत करोनाने आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. जो बायडेन यांनी प्रचारसभेत याच मुद्द्यांच्या आधारे ट्रम्प प्रशासानावर टीका केली आहे.

आणखी वाचा- “अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप करणाऱ्या देशाला मोठी किंमत चुकवावी लागेल”

अमेरिकेत ३ नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे प्रचाराने वेग पकडला आहे. “आम्ही आठ महिन्यांहून अधिक करोना विरोधात लढा देत आहोत आणि आतापर्यंत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनाशी सामना करण्यासाठी कोणतीही योजना आणलेली नाही. त्यांनी हार पत्करली आहे ” असे बायडेन म्हणाले.