अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमध्ये सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव जवळजवळ निश्चित आहे. सध्या सुरु असणाऱ्या मतमोजणीमध्ये डेमोक्रेट पक्षाचे उमेदवार जो बायडेन हे बहुमतापासून अवघी काही मतं दूर आहेत. त्यामुळेच बायडेनच अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष होणार असून यावर औपचारिक शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. बायडेन हे अमेरिकेतील सर्वात ज्येष्ठ राजकारण्यांपैकी आहेत. त्यांनी १९७२ साली पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. याच निवडणुकीमध्ये विजय मिळवत सिनेटर म्हणून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा श्री गणेशा केला होता. मागील ४८ वर्षांपासून राजकारणात असणारे बायडेन आता राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. मात्र आज जगातील सर्वात शक्तीशाली देशाच्या प्रमुखपदी विजारमान होण्यास सज्ज असणाऱ्या बायडेन यांच्या आयुष्यात एक काळ असा आला होता जेव्हा त्यांनी आत्महत्येचाही विचार केला होता.

नक्की पाहा >> पगार, भत्ते, घर अन्… अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना मिळणाऱ्या सुविधा पाहून चक्रावून जाल

१९७२ साली बायडेन डेवावेयर येथून सीनेट म्हणून निवडून आले. आतापर्यंत ते सहावेळा सीनेटपदी निवडून आलेत. बराक ओबामा हे राष्ट्राध्यक्ष असताना बायडेन हे अमेरिकेचे ४७ वे उपराष्ट्राध्यक्ष होते. या निवडणुकीमध्ये त्यांनी लोकप्रिय मतांचा विक्रम मोडला होता. बायडेन हे अमेरिकन राजकारणाच्या इतिहासातील पाचवे सर्वात तरुण सीनेटर होते. आता या उलट जर बायडेन राष्ट्राध्यक्ष झाले तर ते अमेरिकेचे सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष ठरतील. बायडेन हे ७८ वर्षांचे आहेत. अमेरिकेमध्ये आपल्या जो या नावाने लोकप्रिय असणाऱ्या बायडेन यांचं संपूर्ण नाव खूपच कमी लोकांना ठाऊक आहे. जो बायडेन यांचे संपूर्ण नाव जोसेफ रॉबिनेट बायडेन ज्युनियर असं आहे. बायडेन यांचा जन्म अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील स्कॅटनमध्ये झाला होता. त्यानंतर ते डेलवेयरमध्ये स्थायिक झाले.

नक्की वाचा >> तेव्हा ‘मुंबईकर बायडेन’ यांचं पत्र आलं…; जो यांचं मुंबईशी आहे खासं नातं

बायडेन यांनी आपल्या आयुष्यात जवळच्या तीन प्रिय व्यक्तींना गमावले आहे. १९७२ साली एका कार अपघामध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीचा आणि लहान मुलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांच्या मोठ्या मुलाचे ब्रेन कॅन्सरमुळे निधन झाले. “मी आत्महत्येसंदर्भात विचार केला होता.  डेलवेअयर मेमोरीयल ब्रिजवर जाऊन तिथून नदीत उडी टाकून सगळं संपवून टाकावं असा विचार माझ्या मनात आला होता,” असं बायडेन यांनी सीएनएनच्या एका डॉक्युमेंट्रीसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. ही डॉक्युमेंट्री मागील महिन्यामध्ये प्रदर्शित झाली आहे. मात्र ते फक्त विचारच होते. मी कधी यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलले नाही, असंही बायडेन म्हणाले होते. त्या घटनेनंतरचा एक प्रसंग सांगताना बायडेन यांनी, “मी कधीच ड्रींक्स घेत नाही. मात्र त्या दिवशी मी बरेच मद्यपाशन केलं होतं. मात्र माझ्या मुलांमुळे यामधून मी सावरलो,” असं म्हटलं होतं.

नक्की वाचा >>  बायडेन राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानात ‘दिवाळी’; असा होणार फायदा

नाताळाच्या सुट्ट्यांमध्ये खरेदी करुन घरी येत असतानाच बायडेन यांची ३० वर्षीय पत्नी निलिया आणि १३ महिन्याची मुलगी नाओमी यांचा डेलवेयरमध्ये मृत्यू झाला होता. त्यांची मुलं हंटर आणि बाओ हे दोघे या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले होते. बायडेन यांनी आयुष्यामध्ये अनेक संकटांना तोंड दिलं आहे. अनेकदा त्यांना यामध्ये खूप मानसिक त्रासही झाला आहे. त्यामुळेच ते प्रचारादरम्यान अनेकदा मानसिक आरोग्यासंदर्भात बोलताना दिसले.