01 March 2021

News Flash

बायडेन-हॅरिस पर्वास आरंभ

अमेरिकेतील सत्तांतराचे जगभर स्वागत

अमेरिकेतील सत्तांतराचे जगभर स्वागत

वॉशिंग्टन : अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून जोसेफ बायडेन ज्युनियर आणि अमेरिकेच्या ४९व्या उपाध्यक्ष म्हणून कमला देवी हॅरिस यांनी बुधवारी स्थानिक वेळेनुसार दुपारच्या प्रहरी आपापल्या पदांची शपथ घेतली. अमेरिकेतील या सत्तांतराची प्रतीक्षा अमेरिकेबाहेरीलही कित्येकांना होती. ‘आजचा दिवस अमेरिकेसाठी आणि लोकशाहीसाठी अमूल्य आहे’ असे अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले.

करोनामुळे ४ लाख अमेरिकींचा झालेला मृत्यू, लाखोंवर कोसळलेले बेरोजगारीचे संकट, उद्योगांची झालेली वाताहत, अमेरिकेमध्ये कधीही नव्हता इतका उफाळलेला वंशभेद आणि वर्णभेद अशी निराशाजनक, भीतिदायक परिस्थिती बायडेन-हॅरिस यांच्या आधीच्या प्रशासनाच्या बेफिकीर कारभारामुळे निर्माण झालेली आहे. या परिस्थितीवर आश्वासक फुंकर घालण्याचा प्रयत्न बायडेन यांनी त्यांच्या संयत परंतु निर्धारपूर्वक भाषणातून केला. अमेरिकेने यापूर्वीही संकटे पाहिली. पण कित्येक संकटे एकाच काळात आलेली नव्हती. अशा वेळी ऐक्य हेच आपले प्रभावी शस्त्र बनू शकते, असे बायडेन म्हणाले. ६ जानेवारी रोजी ट्रम्प यांच्या गुंडांनी ज्या इमारतीवर विकृत हल्ला चढवला, त्याच इमारतीत पार पडलेला हा सोहळा लोकशाहीप्रेमींसाठी आश्वासक ठरला.

अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी बायडेन यांना, तर अमेरिकी सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या लॅटिन-वंशीय न्यायमूर्ती सोनिया सोटोमायर यांनी कमला हॅरिस यांना शपथ दिली. ७८ वर्षांचे बायडेन हे अमेरिकेचे आजवरचे सर्वात वयोवृद्ध नवनियुक्त अध्यक्ष ठरले. तर ५६ वर्षीय कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला, तसेच आफ्रिकी-भारतीय वंशाच्या उपाध्यक्ष ठरल्या.

मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शपथविधी समारंभास अनुपस्थित राहिले. मावळते उपाध्यक्ष माइक पेन्स हे मात्र उपस्थित होते. याशिवाय बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू. बुश, बराक ओबामा हे माजी अध्यक्षही सपत्नीक उपस्थित होते. लेडी गागा, जेनिफर लोपेझ अशा अनेक कलाकारांची उपस्थिती या सोहळ्याचे वैशिष्टय़ ठरले. बायडेन यांचे भाषण भारतीय वंशाचे सहायक विनय रेड्डी यांनी लिहिले होते. करोनाच्या प्रादुर्भावामुळे या समारंभात तुलनेने कमी उपस्थिती होती. कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. डेमोक्रॅटिक पक्षाच्या धोरणांशी सुसंगत अशा मुखपट्टय़ांचा वापर आणि अंतरनियम पालनाबाबतची जागरूकता लक्षणीय होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2021 2:00 am

Web Title: joe biden sworn in as 46th president of the united states kamala harris as vice president zws 70
Next Stories
1 लष्कराचे गुपित फोडणे हा देशद्रोह -अँटनी
2 ‘आधार’विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3 समितीतील सदस्यांबाबतच्या आक्षेपावर सर्वोच्च न्यायालयाची नापसंती
Just Now!
X