अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. डेमोक्रॅटिक पक्षाकडून जो बायडेन तर रिपब्लकन पार्टीकडून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रिंगणात आहे. निवडणुकीच्या या धामधुमीत जो बायडेन यांनी नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज पासून नवरात्रीचा उत्सव सुरु झाला आहे.

“हिंदू सण नवरात्री सुरु झाला आहे. अमेरिका आणि जगभरात नवरात्रीचा सण साजरा करणाऱ्या सर्वांना जिल आणि माझ्याकडून शुभेच्छा. चांगल्याचा वाईटावर पुन्हा एकदा भव्य विजय होईल. एक चांगली सुरुवात होईल, सर्वांना संधी मिळेल” असे जो बायडेन यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक हा अमेरिकेत स्थायिक झालेला स्थलांतरितांचा दुसरा सर्वात मोठा गट आहे. भारतीय वंशाच्या नागरिकांची मते मिळवण्यासाठी डेमोक्रॅट आणि रपब्लिक दोघांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. ट्रम्प यांच्या प्रचार अभियानाच्या व्हिडीओमध्ये मोदी यांच्यासोबतच्या कार्यक्रमाचे फुटेजही होते. हा भारतीय वंशाच्या नागरिकांची मते मिळवण्याचा एक भाग आहे.

जो बायडेन यांना याआधी गणेश चतुर्थीच्याही शुभेच्छा दिल्या होत्या. “अमेरिका, भारत आणि जगभरात गणेश चतुर्थी साजरी करणाऱ्या प्रत्येकाला सर्व अडथळयांवर मात करता येऊ दे, नव्या सुरुवातीकडे जाणारा मार्ग मिळूं दे” अशा शब्दात बिडेन यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात बिडेन यांनी उपराष्ट्राध्यक्षपदही भूषवले आहे.