लहान मुलांसाठी प्रसाधनांची निर्मिती करणाऱ्या जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन या कंपनीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (सीडीएससीओ) दणका दिला असून कंपनीच्या हिमाचल प्रदेशमधील प्रकल्पातून नियंत्रण संस्थेने नमुने गोळा केले आहेत. कंपनीच्या बेबी पावडरमध्ये कर्करोगासाठी कारणीभूत ठरणारे अंश सापडल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन ही कंपनी गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने गेल्या आठवड्यात एक वृत्त प्रकाशित केले होते. बेबी पावडरमध्ये घातक अ‍ॅस्बेस्टॉस असल्याचे जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनला अनेक दशकांपासून माहीत असल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले होते. कंपनीचे अधिकारी, खाण व्यवस्थापक, वैज्ञानिक, डॉक्टर्स आणि वकिलांना याबाबत माहिती होती, पण त्यांच्यापैकी कोणीही याची वाच्यता केली नाही, असे या वृत्तात म्हटले होते. १९७१ पासून ते सन २००० पर्यंत जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या बेबी पावडरच्या कच्च्या मालात तसेच विक्रीसाठी बाजारात आलेल्या बेबी पावडरमध्ये अ‍ॅस्बेस्टॉस असल्याचे आढळल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला होता. या वृत्तानंतर जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या शेअर्सच्या दरातही घसरण झाली होती. तर जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनने हे वृत्त निराधार आणि चुकीचे असल्याचा दावा केला होता.

रॉयटर्सच्या वृत्तानंतर आता भारतातील केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. कंपनीच्या हिमाचल प्रदेशमधील प्रकल्पातून नमुनेही गोळा करण्यात आले आहेत. तर जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या प्रकल्पांची आणि विक्री करणाऱ्यांकडील मालाची तपासणी करण्यासाठी १०० हून अधिक निरीक्षकांचे पथक नेमण्यात आल्याचेही सांगितले जाते. अद्याप केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, मंत्रालयातील सूत्रांनी या वृत्ताची दखल घेण्यात आली असून हे वृत्त धक्कादायक असल्याचे सांगितले. जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या प्रकल्पावर छापा टाकण्यात आल्याचे किंवा नमुने जप्त केल्याचे वृत्त फेटाळण्यात आले.