करोना विषाणूंचा प्रसार अजूनही थांबलेला नाही. दिवसाला हजारो रुग्णांना संसर्ग होत असून अनेकांना जीवही गमवावा लागत आहे. करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सगळ्यांच्या नजरा सध्या करोना लशीकडे लागल्या आहेत. भारतासह जगभरात लशींच्या चाचण्या सुरू असून, अमेरिकेतील जॉन्सन अँड जॉन्सन निर्माण केलेल्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. दुसरीकडे जॉन्सन अँड जॉन्सन आता याच लशीच्या लहान मुलांवरही चाचण्या करणार आहे. कंपनीनं ही माहिती दिली आहे.

अमेरिकेत मॉर्डना, पीफायझर या कंपन्यांप्रमाणे जॉन्सन अँड जॉन्सननही करोना लशीवर संशोधन करत आहे. जॉन्सन अँड जॉन्सननच्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सध्या सुरू आहेत. त्याचबरोबर कंपनी आता या लशीच्या लहान मुलांवर चाचण्या करण्याच्या तयारीत आहे.

१२ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांवर करोना लशीची लवकरात लवकर चाचणी करण्याची जॉन्सन अँड जॉन्सनची योजना आहे. कंपनीच्या मागच्या अनुभवाप्रमाणे मुलांना दिल्या जाणाऱ्या लशींमधील त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकेल, असं जॉन्सन अँड जॉन्सननं म्हटलं आहे.

अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्राची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत जॉन्सन अँड जॉन्सनचे डॉ. जेरी सॅडोफ म्हणाले,”आम्हाला शक्य होईल तितक्या लवकर लहान मुलांवर चाचण्या करण्याची योजना आहे. पण सुरक्षिततेची बाब लक्षात घेऊन या चाचण्या अत्यंत काळजीपूर्वक करण्यात येतील,” असं त्यांनी बैठकीत सांगितलं.

“सुरक्षितता आणि इतर गोष्टींवर हे अवलंबून असेल. १२ ते १८ वयोगटानंतर कंपनीची प्रत्येक लहान मुलांवर चाचण्या करण्याचीही योजना आहे,” सॅडोफ म्हणाले. या चाचण्या कधीपर्यंत केल्या जातील, याचा कालावधी मात्र सॅडोफ यांनी सांगितला नाही. यासंदर्भात औषध नियंत्रकाशी व कंपनीच्या भागादाशी चर्चा सुरू असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे.

जॉन्सन अँड जॉन्सननं आपल्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सप्टेंबरमध्ये सुरूवात केली होती. त्यानंतर एका स्वयंसेवकाची प्रकृती बिघडल्यानं चाचण्या थांबवण्यात आल्या होत्या. काही आठवड्यांपूर्वी लशीच्या चाचण्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.