लहान मुलांसाठी प्रसाधनांची निर्मिती करणाऱ्या ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ या कंपनीला अमेरिकेतील केंद्रीय ‘अन्न व औषध प्रशासन’ विभागाने (FDA) दणका दिला आहे. कंपनीच्या बेबी पावडरमध्ये कर्करोगासाठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचे अंश आढळून आले आहेत. त्यामुळे कंपनीला मार्केटमधून बेबी पावडरचे तब्बल ३३ हजार डबे परत मागवावे लागले आहेत. दरम्यान एका विशिष्ट बॅचचे डबे परत बोलावले असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ बेबी पावडरमध्ये ‘अ‍ॅसबेस्टस’ नावाचा पदार्थ सापडला आहे. या पदार्थामुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ कंपनीच्या बेबी पावडरचे ३३ हजार डबे परत मागवण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या इतर उत्पादनांची आणि विक्री करणाऱ्यांकडील मालाची तपासणी करण्यासाठी १०० हून अधिक निरीक्षकांचे पथक देखील नेमण्यात आले आहे असे वृत्त काही अमेरिकी माध्यमांनी दिले आहे. मात्र असे कुठलेही पथक नेमण्यात आले नसल्याचे व सदर वृत्त निराधार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

अलिकडेच अमेरिकेच्या आरोग्य नियामक मंडळाने ‘अ‍ॅसबेस्टस’ या पदार्थाबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात अ‍ॅसबेस्टसमुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढते असे म्हटले होते. त्यामुळे आता भारतातही या संदर्भात सरकार काही पावले उचलेल का व बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाय करेल का याकडे लक्ष लागले आहे. मात्र या प्रकरणामुळे ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ या कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.