जगभरात करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत करोनावरील लस विकसित करण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहे. अमेरिका, भारत, ब्राझील या देशांना करोना विषाणूचा मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेतून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सला करोनावरील लस विकसित करण्याच्या दिशेनं अजून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ज्या स्वयंसेवकाला ही लस देण्यात आली होती, ते वैद्यकीय चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचले असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी याबाबत माहिती दिली. “जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीकडून ज्या स्वयंसेवकाला करोनावरील लस देण्यात आली होती ते वैद्यकीय चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचले असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. ते अमेरिकेतील चौथे स्वयंसेवक आहेत जे वैद्यकीय चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत,” असं ट्रम्प म्हणाले. यावेळी त्यांनी अमेरिकेतील अन्य नागरिकांना पुढे येऊन या चाचणीसाठी नोंदणी करण्याचं आवाहनही केलं.

यावेळी त्यांनी राजकीय विषयावरदेखील भाष्य करत विरोधी पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बिडेन यांच्यावरही हल्लाबोल केला. “अमेरिकेत्या इतिहासात आर्थिक सुधारणांना सर्वात वेगानं आम्ही पुढे नेल्या आहेत. आमचा वैज्ञानिक दृष्टीकोन आहे. परंतु बिडेन हे विज्ञान विरोधी दृष्टीकोन असलेलेल व्यक्ती आहेत,” असंही ट्रम्प म्हणाले. बिडेन यांनी चीन आणि युरोपच्या प्रवासावर बंदी आणि त्यावर आखण्यात आलेल्या धोरणांचा विरोध केला. त्यांच्याकडे कधीही न संपणारा लॉकडाउन आहे. परंतु आम्ही लॉकडाउन लागू करत नाही. आमची योजना विषाणूवर विजय मिळवण्याची असून बिडेन यांच्या योजना अमेरिकेसाठी घातक असल्याचंही ट्रम्प यांनी नमूद केलं.