अंडाशयाचा कर्करोग झालेल्या महिलेस भरपाई देण्याचा अमेरिकेतील न्यायमंडळाचा आदेश
जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन कंपनीची टाल्कम पावडर अनेक वर्षे वापरल्यानेच आपल्याला अंडाशयाचा कर्करोग झाला, हा दक्षिण डकोटा येथील एका महिलेचा दावा सेंट लुइस येथील न्यायमंडळाने ग्राह्य़ धरीत या महिलेला साडे पाच कोटी डॉलरची भरपाई देण्याचे आदेश सोमवारी दिले. अवघ्या तीन महिन्यांत कंपनीवर झालेली ही दुसरी दंडात्मक कारवाई असली तरी या निकालाला आव्हान देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
अमेरिकेतील साऊथ डकोटा येथे राहणाऱ्या ग्लोरिया रिस्टसंड या महिलेने जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन कंपनीवर खटला दाखल केला होता. या महिलेचा दावा होता की, तिने कंपनीची बेबी पावडर आणि शॉवर टू शॉवर पावडर ही उत्पादने अनेक वर्षे वापरली. त्यातून तिला अंडाशयाचा कर्करोग जडला.
जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या विरोधात सध्या अशा प्रकराचे १२०० खटले सुरू आहेत. टाल्क पावडर वापरल्याने होणाऱ्या कर्करोगासारख्या संभाव्य धोक्यांसंबंधी पुरेशी माहिती कंपनीने आपल्या उत्पादनांवर दिली नाही, असा या ग्राहकांचा आरोप आहे. टाल्क पावडरीचा अंडाशयाच्या कर्करोगाशी असलेल्या संबंधावर १९७०च्या सुमारास संशोधन सुरू झाले. कंपनीलाही गेली ३० वर्षे टाल्क पावडरच्या धोक्याची माहिती होती, असाही दावा याचिकाकर्त्यांनी केला.
गेल्या तीन महिन्यांत कंपनीवर अशा प्रकारे दुसऱ्यांदा नामुष्की ओढवली आहे. कंपनीची पावडर वापरल्याने अंडाशयाचा कर्करोग होऊन मरण पावलेल्या अलाबामा राज्यातील महिलेच्या नातेवाईकांना सात कोटी २० लाख डॉलरची भरपाई देण्याचे आदेश सेंट लुईसच्याच न्यायमंडळाने फेब्रुवारी महिन्यात दिले होते.
या संदर्भात कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, आमच्या ३० वर्षांच्या सुरक्षाविषयक संशोधनाच्या विरोधात हा निकाल आहे. आम्ही उत्पादनांच्या निर्धोकतेचा पुरस्कार करीत राहूच.