अमेरिकेच्या मिसुरी येथील न्यायालयाने गुरूवारी सौंर्दयप्रसाधने बनवणाऱ्या ‘जॉन्सन अॅण्ड जॉन्सन’ कंपनीला व्हर्जिनियातील एका महिलेला दंडापोटी ११ कोटी रूपये देण्याचे आदेश दिले आहेत. या महिलेने ‘जॉन्सन अॅण्ड जॉन्सन’ची टॅल्कम पावडर वापरल्याने आपल्याला गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचा दावा करत न्यायालयात धाव घेतली होती.

जॉन्सन अॅण्ड जॉन्सनची उत्पादने वापरल्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका आहे, याची ग्राहकांना पूर्वकल्पना देण्यात येत नसल्याच्या आक्षेपामुळे मिसुरीच्या सेंट लुईस न्यायालयात कंपनीविरुद्ध तब्बल २४०० खटले दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वीच्या तीन खटल्यांमध्ये जॉन्सन अॅण्ड जॉन्सनला एकत्रितपणे तब्बल १९.५ कोटी डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, कालचा निर्णय हा जॉन्सन अॅण्ड जॉन्सनविरोधातील सर्वात मोठी दंडात्मक कारवाई मानली जात आहे. व्हर्जिनिया येथे राहणाऱ्या लॉईस स्लेम्प या महिलेने हा खटला दाखल केला होता. २०१२ मध्ये लॉईस यांना गर्भाशयाचा कॅन्सरचे निदान झाले होते. त्यानंतर हा कॅन्सर त्यांच्या यकृतापर्यंत पसरला होता. मी सतत ४० वर्षे जॉन्सन अॅण्ड जॉन्सनची टॅल्कम पावडर वापरत होते. त्यामधील काही घटकांमुळे आपल्याला कॅन्सर झाल्याचा दावा लॉईस यांनी केला होता. विशेषत: लहान मुलांसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘जॉन्सन अॅण्ड जॉन्सन’ बेबी आणि शॉवर टू शॉवर पावडरमध्ये कॅन्सरजन्य घटक असल्याचेही लॉईस यांनी म्हटले होते. या प्रकरणी न्यायालयाने निकाल देताना नुकसान भरपाई म्हणून ५४ लाख डॉलर्स देण्याचे आदेश दिले. याशिवाय दंडात्मक कारवाई म्हणून १०.५ कोटी डॉलर्स आणि जॉन्सन अॅण्ड जॉन्सनचे उत्पादन करणाऱ्या आयमरिस या कंपनीला ५० लाखांचा दंड ठोठावण्यात आला. दरम्यान, ‘जॉन्सन अॅण्ड जॉन्सन’ने लॉईस यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त केली असली तरी ते या निकालाविरुद्ध अपील करणार आहेत.