अमेरिकेत सध्या वापरास परवानगी मिळालेल्या Johnson & Johnson Vaccine चं भारतात उत्पादन करण्याचे प्रयत्न अमेरिकेकडून सुरू करण्यात आले आहेत. अमेरिकेचे गृहसचिन डॅनियल स्मिथ यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. भारतातील लस उत्पादक आणि अमेरिकी कंपन्या यांच्यामार्फत संयुक्तपणे या लसीचं उत्पादन करता येणं शक्य आहे का? याची चाचपणी सध्या सुरू करण्यात आली आहे. भारतात सध्या मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढू लागली असताना तिसरी लाट अटळ असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर त्याआधी अधिकाधिक लोकसंख्येला लस देणं आवश्यक असताना लसींचा तुटवडा जाणवू लगला आहे. त्यामुळे लसींचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि अधिकाधिक प्रकारच्या लसी उपलब्ध होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

स्मिथ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “अमेरिकेतील डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन भारतातील लस उत्पादनात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. “Johnson & Johnson लसीच्या उत्पादनासाठी या कॉर्पोरेशनच्या माध्यमातून गुंतवणूक होण्याची शक्यता असून त्यासंदर्भात भारतातील खासगी क्षेत्रामधील कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत. यामुळे लसीचं उत्पादन अधिकाधिक वेगाने करता येणं शक्य होऊ शकेल. यातून पुढील वर्षी म्हणजेच २०२२ च्या अखेरपर्यंत भारतात १०० कोटी लसींच्या डोसचं उत्पादन होऊ शकेल.

“भारताला लसींसाठी कच्चा माल पुरवणं सोपं नाही”

दरम्यान, लसींच्या उत्पादनासाठी भारताला कच्चा माल पुरवणं सोपं काम नसल्याचं यावेळी स्मिथ म्हणाले. काही दिवसांपूर्वी SII अर्थात सिरम इन्स्टिट्युटचे अदर पूनावाला यांनी अमेरिकेने लसीच्या उत्पादनासाठीचा महत्त्वाचा कच्चा माल थांबवून ठेवल्याची तक्रार केली होती. तसेच, त्या मालाचा पुरवठा तातडीने सुरू करावा, अशी देखील मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने कच्चा माल पुरवण्याची तयारी देखील दाखवली होती.

भारतात मृत्यूची त्सुनामी; २४ तासांत करोनाबळींचा नवा उच्चांक

स्मिथ म्हणाले, “भारत सरकारने कच्च्या मालाची यादी दिली आहे. अमेरिका या मालाचा आणि इतर साधनांचा पुरवठा तातडीने करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, जागतिक स्तरावरच कच्च्या मालाची पुरवठा साखळी विस्कळीत होऊ लागल्यामुळे हे सोपं नाही. आम्ही सध्या भारतासोबत या यादीवर काम करत आहोत. आमच्याकडे काय उपलब्ध आहे, काय आम्ही पुरवू शकतो आणि किती वेगाने त्याचा पुरवठा करता येऊ शकेल यावर आम्ही काम करत आहोत. कच्च्या मालाच्या पुरवठ्याची समस्या जगातील सर्वच लसींच्या बाबतीत आहे.”