अमेरिकेत जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने तयार केलेल्या करोना लशीच्या चाचण्या एका स्वयंसेवकाला स्पष्टीकरण करता न येणारा आजार झाल्याने थांबवण्यात आल्या आहेत. यापूर्वी ऑक्सफर्ड लशीच्या चाचण्या अशाच प्रकारे थांबवून नंतर पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या.

जॉन्सन अँड जॉन्सनने संबंधित व्यक्तीला झालेला आजार लशीशी संबंधित आहे की नाही यावर अभ्यास सुरू केला आहे. कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे की, कुठल्याही लशीच्या चाचण्यांत अपघात, आजार व इतर काही गोष्टी नेहमीच संभवत असतात, विशेष करून मोठय़ा पातळीवरील चाचण्यांत असे होत असते, पण आमचे डॉक्टर्स व सुरक्षा पथक सदर लस टोचलेल्या व्यक्तीला असा आजार कशामुळे  झाला असावा याचा तपास करीत आहे. तूर्त तरी चाचण्या थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘स्टॅट’ या वृत्त संकेतस्थळावर या चाचण्या थांबवण्यात आल्याची माहिती सर्वप्रथम देण्यात आली. अ‍ॅस्ट्राझेन्का व ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या लशीच्या चाचण्या अमेरिकेत थांबवण्यात आल्या होत्या. चाचणीच्या वेळी एका महिलेला ट्रान्सव्हर्स मायलेटिस हा मेरुरज्जूचा दुर्मीळ आजार झाल्याने त्या थांबवण्यात आल्या होत्या पण तो आजार लशीमुळे झाला नसल्याचे स्पष्ट झाल्यानतंर या चाचण्या पुन्हा सुरू करण्यात आल्या.

करोनाकाळात महाराष्ट्रात सर्वाधिक जैववैद्यकीय कचरा

नवी दिल्ली : भारतात कोविड काळात १८,००६ टन जैववैद्यकीय कचरा गेल्या चार महिन्यात तयार झाला असून यात महाराष्ट्रातील कचऱ्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ३५८७ टन इतके होते, असे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे. सप्टेंबरमध्ये देशात सर्वाधिक ५५०० टन जैववैद्यकीय कचरा तयार झाला. महाराष्ट्रातील कचऱ्याचे प्रमाण जूनपासून चार महिन्यांत सर्वाधिक  होते. त्याखालोखाल तमिळनाडू १७३७ टन, गुजरात १६३८ टन, केरळ १५१६ टन, उत्तर प्रदेश १४३२ टन, दिल्ली १४०० टन असे प्रमाण होते.