सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीनबाग येथे सुरु असलेले महिलांचे आंदोलन सध्या देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. या आंदोलनाने संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. दरम्यान, यासंदर्भात केरळमधील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाला एका कंपनीकडून आलेला ई-मेल चर्चेत आला आहे. नोकरीसाठी अर्ज केलेल्या या तरुणाला “शाहीनबागच्या आंदोलनात सहभागी हो आणि बिर्याणी खा” असा ई-मेल या कंपनीने केला आहे.

केरळमधील थिरुवअनंतपुरम येथील मूळचा रहिवासी असलेला अब्दुल्ला एस. एस. नामक तरुण सध्या दुबईमध्ये वास्तव्याला आहे. त्यालाच हा ई-मेल आला असून त्याचा स्क्रीनशॉट सध्या व्हायरल झाला आहे. अब्दुल्लाने एका जॉब पोर्टलच्या ई-मेल आयडीवरुन नोकरीसाठी अर्ज पाठवला होता. त्यानंतर त्याच्या ई-मेलला रिप्लायही आला. यामध्ये “तुला काम कशाला हवं आहे? दिल्लीला जा आणि शाहीनबागमधील आंदोलनात सामील हो, तिथं तुला दररोज १००० रुपये आणि मोफत जेवणही मिळेल. यामध्ये बिर्याणी, चहा आणि दूध आणि कधीतरी गोडही खायला मिळेल.” असा उल्लेखही करण्यात आला आहे.

अब्दुल्लाने मेकॅनिकल इंजिनिअर असल्याचा उल्लेख नोकरीचा अर्ज पाठवताना ई-मेलच्या टायटलमध्ये केला होता. तसेच ट्रेनिंगच्या काळात पगाराशिवाय काम करण्याची तयारी असल्याचेही त्याने यात म्हटले होते. त्यानंतर तासाभराने त्याच्या याच मेलला हा रिप्लाय आला. जयंत गोखले नामक व्यक्तीच्या ई-मेलवरुन हा रिप्लाय आल्याचे स्क्रीनशॉटमध्ये दिसते आहे. अब्दुल्लाला मिळालेल्या या ई-मेलचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला असून या ई-मेलला रिप्लाय करणाऱ्यावर टीकाही केली आहे. अशा प्रकारे विशिष्ट धार्मिक ओळख असलेल्या एका बेरोजगार तरुणाला त्रास दिल्याबद्दल नेटकऱ्यांनी त्याला सुनावले आहे. दरम्यान, पैसे घेऊन आंदोलन केले जात असल्याचा आरोप सध्या शाहीनबाग येथील आंदोलनकर्त्यांवर केले जात आहेत.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अब्दुल्लाने म्हटले, मी कामाच्या शोधात असल्याने अशा प्रकारे अनेक नोकरीचे अर्ज विविध जॉब पोर्टलच्या ई-मेल आयडीवर पाठवले आहेत. यांपैकी एका ई-मेल आयडीवरुन माझ्या मेलला शाहीनबागचा उल्लेख करीत असा रिप्लाय आला. त्यानंतर मी या मेलचा स्क्रीनशॉट काढला आणि माझ्या भावाच्या मित्राला पाठवला. मला वाटतं त्यानीचं हा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पोस्ट केला असावा. मात्र, यानंतर मला मदतीसाठी अनेकांचे फोन केले. यामध्ये काही अपशब्द वापरलेल्या भाषेतलेही फोन होते, ज्यांनी असे फोन केले त्यांना मीच तो मेल केला असे वाटले होते. अब्दुल्लाने दुबईतून फोनवरुन ही प्रतिक्रिया दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

“अनेकांनी आपल्याला असा मेल पाठवणाऱ्या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासही सुचवले. मात्र, मला याबाबत कोणत्याही कायदेशीर भानगडीत पडायचं नाही” असं अब्दुल्लानं स्पष्ट केलं आहे.