पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी बंगाल गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत सर्पविषाचा मोठा साठा जप्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या विषाची किंमत तब्बल १०० कोटी रूपये आहे. नॉर्थ २४ परगाना जिल्ह्यातील बारासात परिसरात ही कारवाई करण्यात आली.

या विषाची चीनमध्ये तस्करी करण्यात येणार होती. नारायण दास (वय २६), देबोज्योती बोस (४३) आणि बुद्धदेव खानरा (वय ४०) या तिघांना याप्रकरणी दक्षिण कोलकातामधील जाधवपूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. सीआयडीने दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेही आंतरराष्ट्रीय टोळीचे सदस्य आहेत. ते शेजारील देशांमध्ये सापांच्या विषाची तस्करी करायचे काम करतात.

वन्य प्राण्यांच्या अवशेषांना चीनच्या तस्करी बाजारात प्रचंड किंमत आहे. जप्त करण्यात आलेले हे विष वनविभागाने आपल्या ताब्यात घेतले आहे. जानेवारी २०१७ पासून बंगाल-बांगलादेश सीमेवर ‘बीएसएफने केलेली ही चौथी कारवाई आहे. यापूर्वीच्या तीनही कारवाईत मालदा जिल्ह्यातून विष जप्त करण्यात आले होते.

याचप्रकारे मे महिन्यांत बीएसएफ आणि सीमाशुल्क विभागाने सिलीगुडी येथे केलेल्या संयुक्त कारवाईत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले होते. यावेळी त्यांच्याकडून ७० कोटी रुपयांचे विष जप्त करण्यात आले होते.