भारताने माहिती तंत्रज्ञानात क्रांती केली. चंद्रावर, मंगळावर पाऊल ठेवले. जगातील वेगवेगळे विक्रम आपल्या नावे केले. पण देशातील काही भाग असा ही की, तिथे मुलभूत सुविधांची पुर्तताही अद्याप झालेली नाही. देश स्वतंत्र होऊन इतकी वर्षे झाली. पण अजनूही काही गावे, वाड्या-वस्ती विजेपासून दूर आहेत. छत्तीसगडमधील जोकापाठ या गावात स्वातंत्र्यानंतर आज पहिल्यांदाच वीज आली. ग्रामस्थांसाठी ऐतिहासिक असलेल्या आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदीही भावूक झाल्याचे दिसून आले.

बलरामपूरमधील जोकापाठ गावातील मुलांना अभ्यासासाठी दुसऱ्या साधनांचा आधार घ्यावा लागत होता. जंगल आणि डोंगर-दऱ्यांनी वेढलेल्या या गावातील ग्रामस्थांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. आता वीज आल्याने गावाचा विकास वेगाने होईल, अशी आशा ग्रामस्थांना आहे.

या ऐतिहासिक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत खूप आनंद झाल्याचे म्हटले. एवढ्या लोकांच्या आयुष्यात प्रकाश आल्याने मला आनंद होत आहे. मी भावूक झाल्याचेही त्यांनी म्हटले.

तब्बल ७० वर्षांनंतर या गावात वीज आली आहे. वीज आल्याने गावातील मुले चांगल्या पद्धतीने अभ्यास करतील, त्यांची प्रगती होईल, असा आशावाद गावातील सरपंचांनी व्यक्त केला.