जॉर्डनमधील लोकप्रिय फूड चेनमधील रेस्तराँमध्ये कोंबडीच्या मांसांमधून मोठ्या प्रमाणात विषबाधा झाली आहे. यामध्ये एका पाच वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला असून एकूण ८२६ जणांना विषबाधा झाली आहे. देशाची राजधानी असणाऱ्या अमानच्या वायव्येस असणाऱ्या बाल्का शहरामधील सरकारी अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त गल्फ न्यूजने दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी संध्याकाळच्या सुमारास अइन अल बाशा परिसरामधील  रेस्तराँमध्ये चिकन शॉर्मा खाल्ला. त्यानंतर या लोकांना त्रास होऊ लागला. या रेस्तराँमध्ये चिकनचे पदार्थ खाणाऱ्या सर्वांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यापैकी पाच वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासंदर्भातील माहिती प्रिन्स हुसैन रुग्णालयाचे संचालक असणाऱ्या मोहम्मद अबेद यांनी दिल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे.

आरोग्यमंत्री सद् जाबेर यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रयोगशाळेमध्ये या रेस्तराँमधील मांसांची चाचणी करण्यात आली असता शॉर्मा बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या मांसांमध्ये घातक विषाणू आढळून आले. तसेच चौकशीदरम्यान कंपनीने आपल्या फूड चेनमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या रेस्तराँमध्ये एक्सपायरी डेट संपल्यानंतरचे मांस अन्नपदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात आल्याचे निदर्शनास आलं आहे. “एक्सापयरी डेट उलटून गेलेलं पाच टन मांस आणि खराब झालेले अर्धा टन बटाटे जप्त करण्यात आले आहेत. या फूड चेन अंतर्गत असणारे २० रेस्तराँ बंद करण्यात आले आहेत. या सर्व रेस्तराँमधील मांसांची चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,” असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

या प्रकरणानंतर आरोग्यमंत्र्यांनी औषध आणि अन्न प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर शेती आणि पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनाही अन्न पदार्थांच्या दर्जाबद्दल अधिक खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केली असून हॉटेलमध्ये वापरल्या जाणाऱ्या अन्न पदार्थांसंदर्भातील सर्व चौकशी करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या विषबाधेच्या प्रकरणासाठी जबाबदार असणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार ज्या मांसांमधून विषबाधा झाली ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आलं नव्हतं. शॉर्मा हा विशेष सवलतीच्या दरामध्ये विकला जात असल्याने तो खाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे. अवघ्या एक दिनारमध्ये शॉर्मा विकला जात असल्याने अनेकांनी तो खाल्ला असून त्यामुळे विषबाधा झालेल्या ग्राहकांची संख्या अधिक असल्याचे सांगितले जात आहे.