जॉर्डनच्या राजांनी इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांविरुद्ध ‘कठोर युद्ध’ छेडण्याचा इशारा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी, गुरुवारी जॉर्डनच्या लढाऊ विमानांनी लगतच्या सीरिया व इराक येथे दहशतवाद्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात हवाई हल्ले केले.
या हल्ल्यांमध्ये कोणत्या देशाला लक्ष्य करण्यात आले होते, याची माहिती लष्कराने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आलेली नाही. सीरिया व इराकमधील इस्लामिक स्टेटच्या लक्ष्यांवर बॉम्बहल्ले करणाऱ्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी युतीचा जॉर्डन हा भागीदार असला, तरी आतापर्यंत या देशाच्या विमानांनी केवळ सीरियामध्ये हल्ले केले होते.
दहशतवाद्यांनी कैद करून ठेवलेल्या जॉर्डनच्या एका पायलटला जिवंत जाळल्याचा व्हिडीओ गेल्या आठवडय़ात जारी केल्यानंतर, जॉर्डनचे राजे अब्दुल्ला (दुसरे) यांनी इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांविरुद्धची लढाई तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
या दहशतवादी संघटना केवळ आमच्याशीच नव्हे, तर इस्लाम धर्म व त्याच्या पवित्र तत्त्वांशी लढत असल्यामुळे जॉर्डनची प्रतिक्रिया ‘कठोर’ राहील, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.