जगभरातील सव्वा अब्ज कॅथलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू असलेल्या पोप पदावर अर्जेटिनाचे जॉर्ज मारिओ बर्गोग्लिओ यांची बुधवारी चौथ्या फेरीतील मतदानानंतर निवड झाली. त्यांनी ‘पोप फ्रान्सिस प्रथम’ असे नाम धारण केले असून ते रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे पोप आहेत.

मंगळवारी निवडीची सुरू झालेली प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली. ११५ कार्डिनलांनी नव्या पोपची बहुमताने निवड केली. बुधवारी मतदानाच्या तीन फेऱ्या निष्फळ ठरल्याने लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. व्हॅटिकनच्या वेळेनुसार सायंकाळी पोपच्या निवडीचा संकेत म्हणून सिस्टन चॅपेलच्या धुरांडय़ातून पांढरा धूर येऊ लागताच सेंट पीटर्स चौकात हजारो भाविकांनी जल्लोष केला. त्यानंतर सेंट पीटर्स बॅसिलिकासमोरील सज्जात आलेल्या पोप फ्रान्सिस यांनी जगाला दर्शन दिले.