22 September 2020

News Flash

मोदींवर टीका करणारा पत्रकार एका वर्षासाठी पोलिसांच्या ताब्यात

एका पत्रकाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर टीका करणं चांगलंच महागात पडलंय

मणिपूरच्या एका पत्रकाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर टीका करणं चांगलंच महागात पडलंय. या पत्रकाराला मंगळवारी(दि.18) राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासुका) एका वर्षासाठी पोलिसांच्या ताब्यात ठेवण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

किशोरचंद्र वांगखेम असं या पत्रकाराचं नाव आहे. सर्वप्रथम त्यांना 21 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी पश्चिम इंफाळमधल्या कोर्टानं त्यांना 70 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला होता. जामीन देताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येणार नाही असंही कोर्टानं स्पष्ट केलं होतं.

मात्र, ही सुटका झाल्यानंतर रासुकाच्या सल्लागार मंडळानं किशोरचंद्र यांना पुन्हा एका वर्षासाठी ताब्यात घेण्यावर शिक्कामोर्तब केलं. सल्लागार मंडळाच्या सांगण्यानुसार, ‘या पत्रकाराचा इतिहास बघता, तो पुन्हा आक्षेपार्ह वर्तणूक करेल आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यास कारणीभूत होईल त्यामुळे रासुका कायद्याच्या 13व्या कलमाअंतर्गत त्याला बारा महिन्यांपर्यंत पोलिसांच्या ताब्यात ठेवणे योग्य ठरेल’.

किशोरचंद्र यांचे कुटुंबीय त्यांच्या शिक्षेला आव्हान देण्याची शक्यता आहे. रासुकाअंतर्गत कोणालाही कमाल 12 महिन्यांपर्यंत ताब्यात ठेवता येतं. भारतीय पत्रकार संघ आणि प्रेस काउंसिल ऑफ इंडियाने किशोरचंद्र यांच्या अटकेचा निषेध केला आहे. रासुका हा कायदा अत्यंत मागास असून अन्यायकारक असल्याचे मत यापूर्वीही अनेक सामाजिक संस्थांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, रासुकाच्या सल्लागार मंडळाचा निर्णय योग्य असल्याचं सांगत मणीपूरच्या राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनीही या निर्णयावर सही केली असून किशोरचंद्र यांच्या या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे, असे वृत्त एनडीटीव्हीनं दिलं आहे.

काय आहे प्रकरण –
माध्यमांतील वृत्तानुसार, 39 वर्षीय किशोरचंद्र यांनी फेसबुकवर एका व्हिडीओच्या माध्यमातून मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. या व्हिडीओमध्ये त्यांनी, हे राज्यसरकार झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची जयंती साजरी करत असल्याचं मला दुःख होतंय आणि मी तितकाच हैराण आहे. कारण झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा मणिपूरशी काहीही संबंध नाही, त्यांनी मणीपूरसाठी काहीच केलेलं नाही. तरीही त्यांच्या जयंतीनिमित्त मणिपूरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं जातंय, कारण मुख्यमंत्री बीरेन सिंह हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसच्या हातातील बाहुले आहेत अशी टीका त्यांनी केली होती असं सांगण्यात येत आहे. याशिवाय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्याबाबत अवमानकारक शब्दांचा वापर केला होता असंही सांगितलं जातंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 1:06 pm

Web Title: journalist from manipur in 12 month custody for targeting bjp pm modi
Next Stories
1 पत्नीच्या तीन प्रियकरांच्या छळाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या
2 स्मृती इराणींना दिलासा, संजय निरुपम यांची अब्रुनुकसानीची याचिका फेटाळली
3 पंतप्रधान मोदींना बोलण्यासाठी स्क्रिप्टची गरज नसते; नक्वींचे मनमोहनसिंगांना उत्तर
Just Now!
X