अमेरिका स्थित पत्रकार जमाल खाशोगी यांचा मृत्यू झाल्याचे सौदी अरेबियाने मान्य केले आहे. इस्तानबुलमधील सौदीच्या दूतावासात खाशोगी यांचा मृत्यू झाला. दूतावासात खाशोगी ज्यांना भेटले त्यांच्या बरोबर झालेल्या वादावादीतून हा मृत्यू झाला असे सौदी अरेबियाने म्हटले आहे. या प्रकरणी चौकशी सुरु असून सौदीच्या १८ नागरिकांना अटक करण्यात आली आहे. रॉयल कोर्टाचे सल्लागार सौद अल आणि गुप्तचर विभागाचे उपप्रमुख अहमद असीरी यांना पदावरुन काढून टाकण्यात आले आहे.

खाशोगी यांच्या मृत्यूमुळे पुढच्या काही दिवसात अमेरिका आणि सौदी अरेबियामध्ये तणाव आणखी वाढणार आहे. खाशोगी हे सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचे कडवे टीकाकार म्हणून ओळखले जायचे. खाशोगी लवकरच विवाहबंधनात अडकणार होते. त्या संदर्भात कागदपत्र आणण्यासाठी ते २ ऑक्टोंबरला सौदीच्या दूतावासात गेले होते. त्यानंतर ते कोणालाच दिसले नाहीत. त्यांची हत्या झाली असावी असा संशय व्यक्त होता. अखेर सौदी अरेबियाने आता कबुली दिली आहे.

सौदी अरेबियाने खाशोगी यांचा खून केला असेल तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. खाशोगीचा खून सौदी अरेबियाने केल्याचे दिसून आले तर काय करणार, असा सवाल केला असता ट्रम्प म्हणाले की, अतिशय गंभीर परिणाम होतील. हे वाईट आहे, पण अजून अंतिम चित्र स्पष्ट होण्याची वाट बघू या. अमेरिकेचे नागरिक असलेले खाशोगी हे दी वॉशिंग्टन पोस्टसाठी काम करीत होते. खाशोगी यांच्या निधनाचे वृत्त दु:खद असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.