12 December 2017

News Flash

इतिहासकार व ज्येष्ठ पत्रकार स्टॅनली कारनो यांचे निधन

व्हिएतनाम युद्धाबाबत सखोल विवेचन असलेले पुस्तक लिहिणारे पत्रकार व इतिहासकार स्टॅनली कारनो यांचे निधन

न्यूयॉर्क, एपी | Updated: January 28, 2013 5:18 AM

व्हिएतनाम युद्धाबाबत सखोल विवेचन असलेले पुस्तक लिहिणारे पत्रकार व इतिहासकार स्टॅनली कारनो यांचे निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. फिलीपीन्स देशाचा इतिहास त्यांनी लिहिला होता व त्यासाठी त्यांना पुलित्झर पुरस्कारही मिळाला होता. कारनो यांचे मेरीलँड येथे पोटोमॅर येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराने निधन झाले, असे त्यांचे पुत्र मायकेल कारनो यांनी सांगितले.
सुरुवातीला ते ‘टाइम’ नियतकालिकाचे पॅरिसचे प्रतिनिधी होते. त्यानंतर आग्नेय आशियात ते हाँगकाँगमध्ये ब्युरो चीफ होते. नंतर ते व्हिएतनामला आले, त्या वेळी अमेरिकी सैन्याचे तेथील अस्तित्व फार मोठय़ा प्रमाणात नव्हते. १९५९ मध्ये कारनो यांनी व्हिएतनाममध्ये दोन अमेरिकी लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी दिली होती. त्यानंतर तेथे हजारो अमेरिकी लोक मारले गेले याची त्या वेळी कुठलीच पूर्वकल्पना नव्हती. १९७०मध्ये त्यांनी टाइम, वॉशिंग्टन पोस्टसाठी व्हिएतनाम युद्धाचे वार्ताकन केले. १९८३ मध्ये त्यांनी तयार केलेला ‘व्हिएतनाम- अ हिस्टरी’ हा माहितीपट विशेष गाजला होता. त्यांनी फिलीपीन्सवर तयार केलेल्या ‘इन अवर इमेज’ या माहितीपटाला १९९०मध्ये पुलित्झर पारितोषिक मिळाले होते. १९७३ मध्ये त्यांच्या ‘माओ अँड चायना’ या पुस्तकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. १९९७ मध्ये त्यांच्या पॅरिसमधील आठवणींचा संग्रह ‘पॅरिस इन फिफ्टीज’ नावाने प्रसिद्ध झाला होता. व्हिएतनाम युद्धाचे ते टीकाकार होते व अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या शत्रूपैकी एक मानले जात होते. फिलीपीन्सच्या नेत्या कारझॉन अ‍ॅक्विनो यांच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते, पण त्यांनी त्यांच्या कारभारावर मात्र टीका केली होती. कारनो हे एका विक्रेत्याचे पुत्र होते. त्यांचा जन्म १९२५ मध्ये न्यूयॉर्क येथे झाला. विद्यार्थिदशेतच त्यांनी नभोनाटय़े लिहिली होती. शाळेच्या वर्तमानपत्राचे संपादनही केले होते. अर्नेस्ट हेमिंग्वे व हेन्री मिलर या अमेरिकी लेखकांनी फ्रान्सचे केलेले वर्णन वाचून त्यांना फ्रेंच संस्कृतीविषयी आकर्षण निर्माण झाले व ते पॅरिसला गेले. तिथे ते दहा वर्षे राहात होते.

First Published on January 28, 2013 5:18 am

Web Title: journalist stanley karnow who wrote definitive history of vietnam war dies age 87