त्रिपुरात ‘स्यान्दन पत्रिका’ या बंगाली वृत्तपत्राचे ज्येष्ठ पत्रकार सुदीप दत्त भौमिक यांची हत्या भ्रष्टाचार उघड केल्याने झाल्याचा आरोप त्या दैनिकाचे संपादक सुबल कुमार डे यांनी केला आहे. त्रिपुरा स्टेट रायफल्सचे कमांडंट तपन देबब्रह्मा यांच्याबाबतच्या बातम्या भौमिक यांनी दिल्या. आर्थिक अनियमितता व भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढल्याचा दावा डे यांनी केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देबब्रह्मा यांच्या विवाहबाह्य़ संबंधाबाबतही भौमिक यांनी बातमी दिली होती. लिखाणाबाबत बोलायचे आहे असे सांगत, देबब्रह्मा यांनी भौमिक यांना मंगळवारी मुलाखतीसाठी बोलावले. मात्र तुमचे संभाषण ध्वनिमुद्रित करा असे त्यांना बजावले होते असे डे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर दोन तासांनी पोलिसांचा दूरध्वनी आला, त्यात सुदीपला घातपात झाल्याचे सांगितले. त्या वेळी दुसऱ्या प्रतिनिधीला त्रिपुरा स्टेट बटालीयनच्या मुख्यालयात पाठविले मात्र त्याला प्रवेश नाकारण्यात आला. अखेर इतर पत्रकारांसह प्रवेश केल्यावर अधिकाऱ्याशी झालेल्या वादातून भौमिक यांच्यावर गोळी झाडण्यात आल्याचे सांगण्यात आल्याचे डे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी देबब्रह्मा यांना बुधवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. त्रिपुरा पोलीस सेवेतील १९९८ च्या तुकडीतील ते वरिष्ठ अधिकारी आहेत.