मदरशांमध्ये होणाऱ्या कथित लैंगिक अत्याचारांबद्दलचा मजकूर ‘फेसबुक’वर प्रसिद्ध करणाऱ्या महिला पत्रकार व्ही. पी. राजिना यांना संतापलेल्या नेटिझन्सनी ऑनलाइन धमक्या दिल्या. त्या एका मल्याळम वृत्तपत्रात काम करतात.
मदरशातील शिक्षकांकडून मुला-मुलींवर केल्या जाणाऱ्या लैंगिक अत्याचारांबद्दल त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते. बालपणी आपण असे प्रकार अनुभवल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ही पोस्ट प्रसिद्ध केल्यानंतर त्यांच्यावर अश्लील टीकेचा भडीमार सुरू झाला. काहींनी तर थेट धमक्याच दिल्या. तसेच, काहींनी राजिना यांच्या पोस्टबद्दल ‘फेसबुक’कडे तक्रार केल्यानंतर त्यांचे खाते बंद करण्यात आले. आपण लिहिलेल्या पोस्टमध्ये केवळ सत्यच असून त्यात अवास्तव असे काहीही नाही. आपल्याला येणाऱ्या धमक्या सुरूच राहिल्या, तर पोलिसांकडे तक्रार दाखल करावी लागेल. या पोस्टमागील आपल्या उद्देशांबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात असून हा धर्मावरचा हल्ला असल्याचे भासविण्यात येत आहे, अशा शब्दांत त्यांनी आपले दुख व्यक्त केले.