भारतामधील चिनी पत्रकारांच्या व्हिसा मुदतवाढीला नकार दिल्याच्या मुद्द्यावरून चिनी प्रसारमाध्यमांकडून पुन्हा एकदा भारताला टीकेचे लक्ष्य करण्यात आले आहे. अणु पुरवठादार देशांच्या गटातील (एनएसजी) भारताच्या समावेशाला चीनने विरोध केल्यामुळे भारताने हे पाऊल उचलले असेल तर भारताला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे ‘ग्लोबल टाईम्स’च्या संपादकीय लेखात म्हटले आहे. चीनने एनएसजी सदस्यत्त्वाला विरोध केल्याने बदला घेण्यासाठी भारताने हे पाऊल उचलल्याची सर्वत्र चर्चा आहे. नवी दिल्ली (भारत) खरोखरच असे करत असेल तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असे या लेखात म्हटले आहे.
कम्युनिस्ट पक्षाकडून चालविण्यात येणाऱ्या झिनुआ न्यूज एजन्सीच्या भारतस्थित तीन पत्रकारांच्या व्हिसा मुदतवाढीला काही दिवसांपूर्वी नकार देण्यात आला होता. झिनुआ न्यूजचे दिल्लीस्थित ब्युरो चीफ वु कियांग आणि मुंबईतील तांग लू आणि मा कियांग या दोन पत्रकारांच्या व्हिसाची मुदत जुलै महिन्याच्या अखेरीस संपत आहे. त्यामुळे या तिघांनी व्हिसाच्या मुदतवाढीची मागणी केली होती. मात्र, त्यांना मुदतवाढ नाकारण्यात आली होती. हा म्हणजे हकालपट्टीचा प्रकार असल्याचे काही परदेशी वृत्तपत्रांनी म्हटले आहे. व्हिसा मुदतवाढीसाठी कोणतेही औपचारिक कारण देण्यात आलेले नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, हे चिनी पत्रकार मुंबई आणि दिल्लीतील निषिद्ध विभागांमध्ये खोटी नावे सांगून वावरत असत. याशिवाय, या तिघांनी तडीपार करण्यात आलेल्या तिबेटियन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्याचेही वृत्त आहे. मात्र, ग्लोबल टाईम्सकडून ही शक्यता फेटाळण्यात आली असून आमच्या चिनी पत्रकारांना खोटी नावे सांगून मुलाखती घेण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय, दलाई लामा गटाबरोबरच्या मुलाखतींचेही समर्थन करण्यात आले आहे. मात्र, भारताच्या या क्षुद्र कृतीमुळे नकारात्मक संदेश गेला असून त्याचा भारत-चीन संबंधांवर विपरीत परिणाम होईल, असे ‘ग्लोबल टाईम्स’मधील लेखात म्हटले आहे. भारताच्या या कृतीला आपणही प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे. चीनी व्हिसा मिळवणे ही सोपी गोष्ट नाही, याची जाणीव काही भारतीयांना झाली पाहिजे, असा धमकीवजा इशाराही या लेखातून देण्यात आला आहे.