भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आज पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराची पाहणी केली. यावेळी त्यांनी अशा घटना भारताच्या फाळणीच्या वेळी घडल्याचं सांगत या घटनांबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ते कोलकत्ता इथे आपल्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत.

कोलकत्ता विमानतळावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीच्या निकालानंतर तिथे घडलेल्या हिंसाचाराच्या घटना चिंताजनक आणि धक्कादायक आहेत. अशा घटना भारताच्या फाळणीच्या वेळी घडल्याचं मी ऐकलं होतं. स्वतंत्र भारतात निवडणूक निकालानंतर अशा प्रकारच्या घटना घडल्याचं कधी पाहिलं नव्हतं”.

ते पुढे म्हणतात, “वैचारिक लढाई लढण्यासाठी वचनबद्ध आहोत. तृणमूलकडून होणारे हे प्रकार असहिष्णू आहेत. आम्ही लोकशाही पद्धतीने याविरुद्ध लढणार आहोत. मी आता पुढे या हिंसाचारामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या परिवारांना भेटी देणार आहे”.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटना समोर येत आहे. गेल्या दोन दिवसात घडलेल्या हिंसाचाराबाबत भाजपानं चिंता व्यक्त केली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. बंगालमधील कायदा सुव्यवस्थेबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. याबाबतची माहिती राज्यपाल जगदीप धनखर यांनी दिली आहे. त्यातच पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा मुद्दा सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे.

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरुन चर्चा करताना पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर चिंता व्यक्त केली आहे.