लखनौ : भाजप उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ७४ जागा जिंकेल असा विश्वास केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी व्यक्त केला आहे. समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष यांच्या युतीने लोकसभा निवडणुकीच्या उत्तर प्रदेशातील निकालावर काही परिणाम होणार नाही असा दावा त्यांनी केला.

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी सांगितले, की लोकसभेला भाजप ७४ जागा मिळवेल व अनेक विक्रम  मोडेल. नड्डा यांना उत्तर प्रदेशचे निवडणूक प्रभारी नेमल्यानंतर त्यांची ही पहिलीच  भेट होती. लोकसभेतील जागांची संख्या कमी तर होणार नाहीच, उलट ती ७४ पर्यंत जाईल असा दावा त्यांनी केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ७१ जागा मिळाल्या होत्या.  दोन जागा अपना दल या मित्र पक्षाला मिळाल्या होत्या.

उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणूक डावपेचांबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, डावपेच कधी जाहीर केले जात नसतात. ते हळूहळू उलगडत जातात. उत्तर प्रदेशच्या लोकांनी व देशाने भाजपला नेहमीच आशीर्वाद दिले आहेत व यावेळीही विजयाचा विक्रम होईल. आम्हाला गेल्या वेळी ७३ जागा मिळाल्या या वेळी ७४ जागा मिळतील. लोकांचा कल पंतप्रधान मोदी यांच्याकडे आहे. कारण साडेचार वर्षांत आमच्या सरकारने अनेक चांगल्या  योजना राबवल्या आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा हे सुद्धा भाजपला विजय मिळवून देण्यात अग्रभागी असतील. विकास हाच आमचा प्रचाराचा मुद्दा आहे. आम्ही जातीय राजकारणाचा मुद्दा पुढे करणार नाही. समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष यांच्या युतीचा फटका भाजपला बसण्याच्या शक्यतेबाबत विचारले असता ते म्हणाले की, ही युती होणार होती, उलट ही युती म्हणजे भाजपच्या वाढत्या शक्तीला मिळालेली मान्यता आहे. आम्हाला या निवडणुकीत पन्नास टक्क्य़ांपेक्षा अधिक मते मिळवायची आहेत.

निवडणूक आश्वासने भाजपने पूर्ण केली नाहीत, या आरोपावर त्यांनी सांगितले की, मायावती व अखिलेश यांच्या बाबतीत सांगायचे तर ते त्यांची माहिती सांगत आहेत. आम्ही खुल्या मंचावर यावर चर्चा करण्यास तयार आहोत. त्या दोघांनी दलाली, भ्रष्टाचार, बेकायदा कृत्ये याशिवाय काही केले नाही.