भारतातील औषध उत्पादक कंपनी ज्युबिलंट लाइफ सायन्सेसने करोना महामारीवर उपचार करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. ज्युबिलंट जेनेरिकने भारतीय बाजारात ज्युबी-आर या ब्रँड नावाने रेमडेसिवीर बाजारात आणलं आहे. रेमडेसिवीर हे अमेरिकन औषध निर्माता कंपनी Gilead सायन्सेसचे अँटी-व्हायरल औषध आहे. भारतीय बाजारात त्याची किंमत प्रति वायल ४ हजार ७०० रुपये निश्चित केली गेली आहे. एक वायल १०० मिलीग्रामची असते. सध्या भारतीय कंपन्यांसह अन्य कंपन्यादेखील करोनावरील लस विकसित करत आहेत.

ज्युबिलंट जेनेरिका हे औषध वितरण जाळ्याद्वारे करोनावर उपचार करणार्‍या भारतातील १ हजारांहून अधिक रुग्णालयांना हे औषध उपलब्ध करुन देईल. २० जुलै रोजी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (DGCI) भारतामध्ये करोनाच्या गंभीर रुग्णांवरील उपचारांसाठी १०० मिलिग्राम औषधाच्या वापरास परवानगी देण्यात आली होती.

अधिक लोकांना उपलब्ध होणार

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून करोनाचं औषध लाँच करण्याची परवानगी मिळाली असल्याची माहिती ज्युबिलंट लाईफ सायन्सेसकडून देण्यात आली होती. या औषधामध्ये जगभरातील रुग्णांचे प्राण वाचवण्याची क्षमता असल्याचं मत कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हरी एस. भरतीया यांनी सांगितलं होतं. अतिशय कमी किंमतीमध्ये हे औषध बाजारात लाँच करण्यात आलं आहे आणि भारतासह जगभरातील अन्य देशांमध्ये मुबलक प्रमाणात हे औषध उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. ज्युबिलंट भरतीया फाऊंडेशनच्या माध्यमातून लोकांचं अमूल्य जीवन वाचवण्यासाठी आम्ही औषधाचा पुरवठा करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

सध्या जगभरातील १५० पेक्षा अधिक कंपन्या करोनावर लस निर्मिती करण्याचं काम करत आहे. त्यातच रशियानं ऑक्टोबर महिन्यापासून बाजारात करोनावरील लस येणार असल्याचा दावा केला होता.