शैक्षणिक पात्रतेवरून मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्यावर कॉंग्रेस नेते अजय माकन यांच्यासह इतरांनी केलेल्या टीकेला गुरुवारी इराणी यांनी प्रत्युत्तर दिले. माझ्या कामाच्या आधारावर माझी पारख करा, असे उत्तर इराणी यांनी आपल्या टीकाकारांना दिले आहे.
मंत्र्यांना शिक्षणाचीही वानवा..
स्मृती इराणी यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा कारभार सोपविण्यात आल्यानंतर त्यांच्यावर कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून टीका करण्यात येऊ लागली. इराणी यांचे शिक्षण बारावीपर्यंतच झालेले असल्याने त्यांच्यावर शिक्षण विषयक धोरण ठरविणाऱया मंत्रालयाचा कारभार कसा काय सोपविण्यात आला, असा प्रश्न विचारण्यात येत होता. इराणी यांच्यावर झालेल्या टीकेला भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रत्युत्तर दिले होते. जलसंपदा मंत्री उमा भारती यांनीही इराणी यांच्यावर सोपविलेल्या जबाबदारीवरून त्यांची पाठराखण केली होती. खुद्द इराणी यांनी या टीकेला उत्तर दिले नव्हते. गुरुवारी आपल्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिले. कामापासून माझे लक्ष विचलित करण्यासाठीच माझ्यावर अशी टीका करण्यात येत आहे. मात्र, आत्तापर्यंत माझ्यातील क्षमतांमुळेच पक्षाने माझ्यावर विविध जबाबदाऱया दिल्या आहेत. माझी पारख माझ्या कामाच्या आधारावर करा, असे इराणी म्हणाल्या.
स्मृती इराणींच्या शैक्षणिक ‘विस्मृती’वरून वादंग