भारतीय वंशाचे कायदातज्ज्ञ पद्मनाभन श्रीकांत ऊर्फ श्री श्रीनिवासन (५२) यांनी इतिहास रचला आहे. अमेरिकेतील फेडरल सर्किट न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. चंदीगड या ठिकाणी जन्मलेले श्रीनिवासन आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खालोखाल महत्त्व असलेल्या फेडरल सर्किट न्यायालयाचे प्रमुखपद सांभाळणार आहेत.

श्रीनिवासन हे भारतीय-अमेरिकन आहेत. या पदावर कार्यरत असणारे ५२ वर्षीय श्रीनिवासन दक्षिण आशियाई वंशाचे पहिले व्यक्ती ठरले आहेत. अमेरिकेतील द्वितीय उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश म्हणून श्रीनिवासन यांनी काम पाहिले आहे.

श्रीनिवासन उच्च श्रेणीत बी.ए. उत्तीर्ण असून, स्टॅनफोर्ड विधी विद्यालयातून उच्च श्रेणीत त्यांनी कायद्याची पदवी मिळवली आहे. न्यायाधीश जे. हारवी विल्कीन्सन यांचे सहायक म्हणून आपल्या व्यावसायिक जीवनाला सुरूवात करणारे श्रीनिवासन आता अमेरिकेत मुख्य न्यायाधीश बनले आहेत.

कोण आहेत श्रीनिवासन ?
चंदिगडमध्ये जन्मलेल्या श्रीनिवासन यांचे मूळ गाव तमिळनाडूमध्ये आहे. १९७० मध्ये श्रीनिवासन यांचे वडील अमेरिकेच्या कन्सास शहरातील लॉरेन्स येथे स्थायिक झाले. अमेरिकेतच श्रीनिवासन लहानाचे मोठे झाले. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून श्रीनिवासन बी. ए. ची पदवी घेतली. त्यानंतर स्टॅनफोर्ड लॉ स्कूलमधून जे. डी. पदवी मिळवली, तर स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून त्यांनी एमबीए केले. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये श्रीनिवासन यांनी २५ खटले लढवले आहेत.

बराक ओबामा यांचे आवडते न्यायाधीश
२०१३ मध्ये अमेरिकेच्या कोलंबिया जिल्ह्याच्या फेडरल कोर्ट ऑफ अपील्सच्या न्यायाधीश याउच्चपदी नेमणूक झाल्यानंतर श्रीनिवासन हे आवडते न्यायाधीश असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले होते. “माझ्या आवडत्या व्यक्तींपैकी श्रीनिवासन हे आहेत. तसेच अमेरिकन फेडरल कोर्ट ऑफ अपील्सवर पहील्या दक्षिण आशियाई वंशाच्या न्यायाधीशाची नियुक्ती झाली ही माझ्यासाठीही अभिमानाची गोष्ट आहे.” असं ओबामा म्हणाले होते.