केरळमध्ये आलेल्या पुरामध्ये राज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बेघर झालेल्या नागरिकांचे पुर्नवसन करण्यासाठी तसेच इतर नुकसान भरुन काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. जगभरातून केरळला मदतनिधी मिळत असून आता त्यामध्ये आणखी एक भर पडणार आहे. पंचकुलातील विशेष सीबीआय न्यायालयाने तीन जणांवर भ्रष्टाचाराचा आरोप लावला होता. या तिघांना शिक्षा म्हणून कोर्टाने केरळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये भर घालण्यास सांगितले आहे. दंड म्हणून प्रत्येकाने या निधीत १५ हजार रुपये द्यावेत असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या निधीमध्ये एकूण ४५ हजारांच्या भर पडणार आहे.
माजी अधिक्षक अनिल कुमार आणि अजय सिंग तसेच माजी निरीक्षक केंद्राच्या कर विभागातील रविंद्र दहिया यांना ३ लाख लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आले होते. कंपनीचा अबकारी कर कमी करण्यासाठी फेब्रुवारीमध्ये ३ लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या खटल्याच्या शेवटच्या सुनावणीला उपस्थित न राहील्याने विशेष सरकारी न्यायाधीश जगदीप सिंग यांनी ही शिक्षा सुनावली आहे. १ ऑक्टोबरला पुढील सुनावणी असून त्याआत हा निधी भरण्यास सांगण्यात आले आहे. फिर्यादीचे साक्षीदार आणि पुराव्यांची फेरपडताळणी केल्यानंतर ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
कंपनीचा अबकारी कर कमी करण्यासाठी ही लाच घेण्यात आली. कंपनी आणि आरोपी यांच्यामध्ये झालेल्या डीलनुसार एकूण ९ लाखांची लाच घेण्याच ठरले होते. त्यातील ३ लाख पहिल्या टप्प्यात देण्यात आले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांना सापळा लावून पकडण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 1:46 pm